25 March 2019

News Flash

कापडी-कागदी पिशव्यांना मागणी वाढली

प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे सहकार भंडारनेदेखील कापडी पिशव्यांच्या वापरावर भर दिला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्लास्टिकबंदीबाबत राज्य सरकारने ‘आस्ते कदम’भूमिका घेतली असली तरी आज ना उद्या या बंदीला तोंड द्यावे लागणार, हे माहीत असल्याने काही व्यापाऱ्यांनी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. व्यापाऱ्यांची मागणी वाढल्याने कागदी व कापडी पिशव्या उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपले उत्पादन दुपटीने वाढविले आहे. पिशव्यांबरोबरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही अ‍ॅल्युमिनिअमचे पातळ आवरण असलेल्या डब्यांना, खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ कागदांना मागणी वाढल्याने हा व्यवसायही तेजीत येणार आहे.

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर बंदीमुळे प्लॉस्टिक पिशव्या उत्पादकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. तसेच, प्लास्टिक डबे उत्पादकांचा व्यवसाय पूर्णत: कोलमडलेल्या अवस्थेत आहे. महाराष्ट्रात सुमारे २५६८ पेक्षा अधिक प्लास्टिकच्या उत्पादनाची केंद्रे आहेत. तर सुमारे १२०० पेक्षा अधिक व्यापारी आणि ८००० पेक्षा अधिक किरकोळ व्यापारी आहेत. मात्र यापैकी बरेच उत्पादक आपले व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. अनेक दुकानदारांनी विशेषत: कपडय़ांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कागदी किंवा कापडी पिशव्यांमधून वस्तू देण्यास सुरुवात केल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

घाऊक बाजारात १ ते २ रूपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या रंगीत कागदी पिशव्यांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडय़ाभरात सुमारे दोन हजार कागदी पिशव्यांची विक्री केल्याची माहिती मसजिद बंदर येखील घाऊक व्यापारी सुदेश शहा यांनी दिली. यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्यांची मागणी असून काही विक्रेते त्यावर आपल्या दुकानाचे नाव छापून देण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार दुकानांचे नावदेखील पिशव्यांवर छापून देत असल्याचे शहा म्हणाले.

याशिवाय कापडी पिशव्यांच्या उत्पादकांनीही उत्पादनाचा वेग वाढविल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत कापडी पिशव्यांना घाऊक व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात मागणी वाढल्याची माहिती उत्पादक अमर गुप्ता यांनी सांगितले. पावसाळ्यात कागदी पिशव्यांपेक्षा कापडी पिशव्यांना भाव येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात कापडी पिशव्यांच्या उत्पादनात वाढ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला १०० टक्के पांठिबा असल्याने येत्या दिवसांमध्ये कागदी पिशव्यांचाच वापर करू, असे दादर येथील ‘साडीघर’चे मालक राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

कागदी व कापडी पिशव्यांचा ओलसर, तेलकट किंवा पातळ असे खाद्यपदार्थ गुंडाळण्याकरिता उपयोग होत नसल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही मात्र अ‍ॅल्युमिनिअम कागदाचे आवरण असलेल्या डब्यांना मागणी वाढली आहे. प्लास्टिकचे डब्बे आणि पिशव्यांच्या बंदीमुळे पातळ पदार्थ बांधून देण्याच्या दृष्टीने हे डबे उपयोगी पडतात, असे बिर्याणी विक्रेते साजिद मोहम्मद यांनी दिली. सध्या बाजारात प्लास्टिकचे ताट, ग्लास आदींना पर्याय ठरतील, असे पर्यावरणपूरक ताट, ग्लास, वाटी आदी उपलब्ध आहेत. तसेच द्रव पदार्थासाठी मोठया प्रमाणात टेट्रापॅकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या स्ट्रॉऐवजी पर्यायी कागदी स्ट्रॉदेखील उपलब्ध आहेत.

सहकार भंडारमध्ये कापडी पिशव्यांवर भर

प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे सहकार भंडारनेदेखील कापडी पिशव्यांच्या वापरावर भर दिला आहे. मात्र कापडी पिशवीच्या खरेदीचा भार ग्राहकांना सोसावा लागत आहे. परंतु, बंदी असल्याने बरेचसे ग्राहक घरून येताना कापडी पिशवीआणतात. सहकार भंडारमध्ये भाज्या व फळे ९९ टक्के विघटन होणाऱ्या कॉनस्टर बॅगेतून दिल्या जातात. सध्या येथे कडधान्य व इतर वस्तू प्लास्टिकच्या पिशवीतूनच विकले जात आहेत. प्लास्टिकवर सरसकट बंदी हा उपाय नाही. प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ  शकतो. त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे सहकार भंडारचे बिझनेस प्रमुख विनय पाध्ये यांनी सांगितले.

First Published on April 17, 2018 4:07 am

Web Title: demand for cloth and paper bags shoots up due to plastic ban