करोनाचा फटका; प्रति युनिट दरामध्ये ४० पैशांची घट

सौरभ कुलश्रेष्ठ, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे आर्थिक उलाढाल कमी झाल्याने औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील विजेचा वापर कमी झाला आहे. याचा फटका विजेच्या बाजारपेठेलाही बसला असून, तापमान वाढत असताना विजेचे दर वाढण्याऐवजी गेल्या तीन-चार दिवसांत युनिटमागे ४० पैशांची घट झाल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवडय़ापासून देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. त्यामुळे राज्य सरकारने गर्दी व प्रवास टाळण्यासाठी राज्यातील सरकारी कार्यालयांत ५० टक्के मनुष्यबळावर काम करण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर खासगी कंपन्यांनाही शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा देण्यासाठी बजावले. करोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक आस्थापनांमध्ये काम कमी झाले आहे. त्याचबरोबर घरातून काम करण्याची मुभा देण्यात आल्याने खासगी आस्थापनांमध्येही शुकशुकाट आहे.

औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांमधील काम कमी झाल्याने विजेचा वापर कमी झाला आहे. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रातील विजेची मागणी २१ हजार ११२ मेगावॉट होती. ती गेल्या दोन दिवसांत १९ हजार ९१२ मेगावॉटपर्यंत खाली आली. म्हणजेच सुमारे १२०० मेगावॉटने वीज मागणी कमी

झाली. त्यातून विजेच्या बाजारपेठेतील दरही गेल्या तीन-चार दिवसांत सरासरी तीन रुपये २० पैसे प्रति युनिट या दरावरून घसरून प्रति युनिट दोन रुपये ८० पैशांवर आले. अनिश्चिततेच्या वातावरणाचाच हा परिणाम मानला जात आहे.

कारण काय?

मार्चमध्ये ऊन वाढू लागले की विजेची मागणी वाढते. त्यामुळे हिवाळ्याा कमी वीजमागणीमुळे खाली असलेले वीजबाजारातील दर काही प्रमाणात वाढतात. पण आता राज्यातील उन्हाचा कडाका वाढला असला तरी आर्थिक अनिश्चितता पसरल्याने त्याचा परिणाम वीजमागणी कमी होऊन विजेच्या बाजारपेठेतील दर सुमारे ४० पैशांनी घसरल्याचे दिसते, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले.