दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर असतानाच करोना रुग्ण वाढत असल्यामुळे यंदाही परीक्षा कशा घ्याव्यात, असा पेच निर्माण झाला आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार लेखीच होतील, अशी ठाम भूमिका शिक्षण विभागाने घेतली असताना विद्यार्थी मात्र, ऑनलाइन परीक्षेची मागणी करत आहेत.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने करोना रुग्णांची घटणारी संख्या पाहून दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी सुरू केली. त्यानुसार एप्रिल आणि मेमध्ये परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रकही जाहीर केले. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे लेखी परीक्षा घेण्याऐवजी इतर उपायांचा विचार करण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, परीक्षा लेखीच होतील, अशी ठाम भूमिका मंडळाने घेतली आहे. याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील प्राध्यापक दिनेशकुमार गुप्ता यांनी ४ ते ७ मार्च या कालावधीत ऑनलाइन सर्वेक्षण केले. त्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, असे मत नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांचे मत काय?

कोणत्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी? या प्रश्नाला ६१ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यात यावी असा प्रतिसाद दिला आहे. २० टक्के विद्यार्थ्यांना कोणतेही माध्यम चालणार आहे, तर १९ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा लेखीच असावी, असे मत व्यक्त केले आहे. परीक्षा लेखी झाल्यास केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा नसल्याचे ५३ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल-मे महिन्यांत, लेखी परीक्षा घेण्याबाबत ७९ टक्के विद्यार्थ्यांनी समाधानी नसल्याचे नमूद केले आहे. परीक्षेसाठी अजून अभ्यासक्रम कमी करण्यात यावा, असे मत ८४ टक्के जणांनी नोंदवले .

ऑनलाइन वर्गाबाबत असमाधानी

ऑनलाइन परीक्षा व्हावी असे मत नोंदवत असतानाच वर्षभर चाललेल्या ऑनलाइन तासिकांबाबत  विद्यार्थी असमाधानी आहेत.  ६९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तासिकांबाबत असमाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सर्वेक्षण कसे?

राज्यातील ३६ जिल्ह्य़ांतील १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यातील ७१ टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ७९४ विद्यार्थी बारावीचे, तर ३६ हजार १३४ विद्यार्थी दहावीचे होते. ९ हजार ६७३ विद्यार्थी हे इतर इयत्तांचे होते.