महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी पुरातत्त्व विभागास दिल्या.

राज्यातील गडकिल्लय़ांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातील बैठक सोमवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह गड संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख म्हणाले, गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळे ही महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे या  ऐतिहासिक आणि वैभवशाली वारशांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, या ऐतिहासिक स्थळांना अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी, यासाठी पुरातत्त्व संचालनालयाने त्यांचे जतन व विकासासाठी कृती आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करीत असताना आंतरराष्ट्रीय आणि विविध राज्यांमध्ये कशा पद्धतीने हे काम केले आहे, याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा.

महाराष्ट्रात ४३६ किल्ले आणि ३७६३ स्मारके आहेत. यामधील अनेक किल्ले आणि स्मारके केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीत आहेत, तर काही किल्ले राज्य शासनाने संरक्षित म्हणून घोषित केले आहेत. उर्वरित किल्ले आणि स्मारके यांचे जतन आणि संवर्धन करीत असताना पूर्ण करण्यात येणाऱ्या कामाचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. हे काम करीत असताना किती किल्ले आणि स्मारकांचे काम पूर्ण झाले आहे किंवा अपूर्ण आहे, याबाबत वर्गवारी करण्यात यावी अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.