देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; पुन्हा सत्तारूढ होण्याचा निर्धार

‘मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असून, पुन्हा या पदावर विराजमान होणारच’, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. गोरेगाव येथे आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप मेळाव्याचा समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करतानाच चौफेर टोलेबाजी केली. मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला असताना फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्रीपदी येणार, असे जाहीर केले. मुख्यमंत्री कोणाचा होणार, याबाबत शिवसेना-भाजपचे नेते वक्तव्ये करतात. अशा नेत्यांचे प्रमाण शिवसेनेत अधिक आहे. पण, हा प्रश्न पक्षाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी सोडवू. मी आताही केवळ भाजपचा मुख्यमंत्री नसून शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाचाही आहे. युती करूनच निवडणुका लढवणार असलो तरी जनताच मुख्यमंत्री ठरवते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

‘लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले असले तरी नव्या दमाने रिंगणात उतरावे लागेल. शत्रू दुबळा झाला असला तरी त्याला कमजोर समजू नये, हे कायम लक्षात ठेवावे. युध्दाचे मैदान आता बदलले आहे. मैदान बदलले की शस्त्र आणि रणनीती बदलते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा विचार करुन आम्ही पावले टाकत आहोत’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लढणार सांगून लढलेच नाहीत. विरोधक दुबळे झाले आहेत, पराभूतांबरोबर आपल्याला लढायचे असले तरी त्यांना कमी लेखू नये. विरोधकांचा सन्मानच असून ते पुढील १०-१५ वर्षे तरी विरोधी पक्ष म्हणूनच राहतील, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

भाजप ‘प्रायव्हेट लिमिटेड’ नाही : फडणवीस

उमेदवारीसाठी गुडग्याला बाशिंग लावून बसलेल्या आणि नेत्यांच्या मागे लागलेल्या पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी फैलावर घेतले. अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत पक्षात नाराज असलेल्या नेत्यांनाही त्यांनी सुनावले. भाजप हा काही प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही, तर पब्लिक अनलिमिटेड पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात दमदार वाटचाल करीत असलेल्या भाजपमध्ये येण्याची इच्छा अन्य पक्षातील अनेक नेत्यांना आहे. त्यापैकी चांगल्या व निवडक नेत्यांनाच प्रवेश दिला जाईल. पण त्यामुळे भाजपमधील नेत्यांनी त्रागा करु नये, त्यांचे स्वागतच करावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधानसभेत किमान २२० जागा संपादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर प्रत्येक जागाजिंकण्याचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे पक्षाचा सव्‍‌र्हे, मतदारसंघातील पाहणी, निरीक्षकांची मते व अन्य बाबी पाहून उमेदवारी दिली जाईल. कोणीही नेत्याच्या जवळचा, विश्वासातील आहे, हा निकष न ठेवता जिंकून येण्याची क्षमता व योग्य उमेदवार, हेच पाहिले जाईल. उमेदवारीसाठी नेत्यांच्या मागे लागून मुंबईला येऊ नका, निवेदने देऊ नका, असेही फडणवीस यांनी सुनावले.

‘सरकारला सर्व आघाडय़ांवर यश’

निवडणुकीची कामे जनादेश यात्रा आणि पक्षाच्या विविध मोहिमांच्या माध्यमातून सुरु असली तरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केली. मी महिनाभर राज्यभरात यात्रेमध्ये असलो, तरी या कालावधीत सरकार व प्रशासन गतिमान पध्दतीनेच चालविणार आहे. गेल्या पाच वर्षांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल होत असून पुढील पाच वर्षेही त्याला प्राधान्य राहील. शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग अशा सर्वच आघाडय़ांवर गेल्या पाच वर्षांत राज्याने देशात पहिला क्रमांक  पटकावला आहे. आम्ही बोलल्याप्रमाणे कृती करणारे आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

१ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी महाजनादेश यात्रेची घोषणा केली. ती १ ऑगस्टपासून राज्यभरात काढण्यात येणार आहे. ही यात्रा भाजपची नव्हे, तर जनतेची विकास आणि विश्वास यात्रा असेल, असे फडणवीस म्हणाले. ‘माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. जनता व कार्यकर्ता ही माझी शक्ती आहे. जनतेसाठी पाच वर्षे काम केले. दुष्काळालाही समर्थपणे तोंड दिले. मराठा आरक्षण, धनगर, ओबीसींचे अनेक प्रश्न सोडवून शेतकऱ्यांसाठीही बरेच निर्णय घेतले. हे जनतेपुढे मांडण्यासाठी मी राज्यभरात दौरा करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.