सत्ता मिळालेल्या शहरांमध्ये विविध प्रकल्प सुरू

महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये भरभरून यश मिळालेल्या भाजपने आपल्या मतदारांना खूश करण्यावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणजे २८ शहरांमध्ये १६२२ कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यातील बहुतांशी शहरांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या रोहा शहरातील प्रकल्पांना या योजनेंतर्गत निधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असतो. हा विकास दर अधिकाधिक वाढण्यासाठी नागरिकांना चांगले राहणीमान व गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी अधिकाधिक स्वच्छ शहरांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वानी एकत्रित मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. त्याच वेळी आज सुरू झालेल्या प्रकल्पांची कामे रखडल्यास नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

अमृत व नगरोत्थान अभियानांतर्गत राज्यातील २८ शहरांमध्ये १६२२ कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज त्यांच्या वर्षां निवासस्थानी झाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.