निलेश अडसूळ

चामडय़ाच्या बॅगा, पापड, चकली-चिवडय़ासारखे नानाविध खाद्यपदार्थ, गाडगी-मडकी अशा शेकडो स्वस्त वस्तूंच्या उत्पादनाचे केंद्र असलेली धारावी करोना आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातही नव्या संधी शोधत पुन्हा सक्रिय झाली आहे. पीपीई किट, मुखपट्टया, सॅनिटायझर निर्मितीत ही उद्यमनगरी सध्या गुंतली असून येथील बिघडलेली रोजगारस्थिती त्यामुळे लवकरच पूर्वपदावर येऊ शकेल.

दाटीवाटीची वस्ती असूनही धारावीने करोनावर मात केली आणि इथला संसर्गविरोधी लढा जगभर पोहोचला. महासाथीपासून सावरलेल्या धारावीने आता इथली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यावर भर दिला आहे.

येथील अशोक मिल कंपाउंड येथील अशरफ शेख यांनी गेल्या काही महिन्यांत ३० हजारांहून अधिक पीपीई कीटची निर्मिती केली. ते आता पालिका रुग्णालयात पुरवले जाते. दिवसाला किमान एक ते दीड हजार पीपीइ कीट त्यांच्याकडे बनवले जातात. धारावीतील सुनिल सोनावणे यांचा चामडी बॅगा निर्मितीचा कारखाना आहे. टाळेबंदीत चामडे व्यवसाय थांबल्याने त्यांनी आपल्या कारखान्यातून उत्तम दर्जाच्या मुखपट्टी आणि पीपीईचे उत्पादन सुरू केले.  सध्या मुंबईतील बऱ्याच खासगी रुग्णालयांना आणि औषधालयांना ते पुरवठा करत आहेत.

चर्मकारीवर उपजिविका करणारे नाना शिंदे यांनी रीतसर परवाना मिळवून सॅनिटायझरची विक्री सुरु केली आहे. ‘दुकानदारांकडे येणारे काम बंद झाल्याने आमच्यासारख्या कारागीरांचेही काम गेले. त्यामुळे उपजीविकेसाठी  सॅनिटायझरची विक्री करत आहोत,’ असे शिंदे यांनी सांगितले. येथील बऱ्याच कारागिरांनी सुती आणि नक्षीदार कापड वापरून आकर्षक मुखपट्टय़ा तयार केल्या आहेत. मोठमोठय़ा कपडय़ांच्या दुकानात अशा वस्तूंना खप असल्याने त्या तिथे पुरवल्या जातात. काही कंपन्यांकडूनही कपडय़ांना साजेशी मुखपट्टी बनवण्याची मागणी होत असल्याची माहिती कारागिरांनी दिली.

कारागिंना प्रोत्साहन..

पीपीई कीट आणि मुखपट्टय़ासाठी वापरले जाणारे कापड इथे ‘नेट’चे कापड म्हणून ओळखले जाते. हे अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते. चामडी किंवा रेग्झीनच्या वस्तू बनवताना त्यांचा वापर होतो. बाजारात मिळणाऱ्या करोना प्रतिबंधित वस्तूंचा आकार कसा आहे, ते शिवले कसे जाते, त्याचा पोत काय आहे याचा अभ्यास करून इथल्या कारागिरांनी या वस्तूंचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे या कौशल्याची दखल घेत पालिकेने देखील पीपीई कीट तयार करण्याचे काम धारावीला दिले.

उलाढाल थांबू नये म्हणून.. अस्सल चामडी वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईकरांसह परदेशी पाहुणेही आवर्जून धारावीला भेट देतात. परंतु करोनाकाळात व्यापार-व्यवसाय बंद असल्याने चामडी वस्तू बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचा आणि पर्यायाने कारागीरांचा रोजगार बुडाला. कोटय़वधींची उलाढाल थांबली. ती पुन्हा सुरू व्हावी म्हणून इथल्या इथल्या हरहुन्नरी कारागीरांनी करोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्मिती सुरु केली.

आमचा पारंपरिक व्यवसाय सुरळीत व्हायला बराच काळ जाईल. परंतु तोवर आमच्या आणि कारागिरांच्या पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा, यातून हा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला.

– सुनिल सोनावणे, पीपीई उत्पादक