गेल्या महिन्यात पालिका रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड नगरसेवकांकडून करण्यात येत असतानाच गेल्या १५ दिवसांपासून मधुमेहावरील औषधांचीही चणचण निर्माण झाली आहे. यामुळे पालिका रुग्णालये, दवाखान्यात मधुमेहावरील उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना स्वखर्चाने बाहेरील औषधांच्या दुकानांमधून औषधे खरेदी करावी लागत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह, रक्तदाब आदी आजारांमुळे त्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांना दिलासा देण्यासाठी पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे निदान आणि उपचार सेवा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेच्या या सेवेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिका दवाखान्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये मधुमेहावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे.

पालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसूतिगृहांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. याबाबत विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. त्यानंतर प्रशासनाने औषध खरेदीचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही औषधांची गरजेनुसार खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालयातील अधिष्ठाता आणि अधीक्षकांना देण्यात आले. मात्र यानंतरही रुग्णालयांमधील औषधांच्या स्थितीत फारसा फरक पडल्याचे दिसत नाही, अशी ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी

नागपाडा येथील हकीम अजमल खान दवाखान्यात पाहणी केली असता गेल्या १५ दिवसांपासून मधुमेहावरील औषधेच नसल्याची माहिती तेथील डॉक्टर आणि रुग्णांनी दिल्याचे समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी सांगितले. याबाबत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर पालिका रुग्णालयात ही औषधे नसल्याचे सांगण्यात आले. औषधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत, असे सांगत रईस शेख यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.