नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सुविधा, बांधकाम परवानगी, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे कमी झालेले बांधकाम परवानगीतील टप्पे आणि त्यासाठीच्या शुल्कातील कपात, या संदर्भातील सर्वसमावेशक नियमावली आदींची दखल घेत केंद्र सरकारने शुक्रवारी मुंबई महापालिकेचा ‘डिजिटल इंडिया पुरस्कार’ देऊन गौरव केला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते पालिकेचा सन्मान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार पालिकेला प्रदान करण्यात आला. पालिकेच्या वतीने व्यवसाय विकास कक्षाच्या प्रमुख शशी बाला आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक अरुण जोगळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या समारंभास इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव अजय प्रकाश साहनी आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय उपस्थित होते.
प्रशासकीय कामकाजात सुधारणा व्हावी, महसूल संकलनात वाढ व्हावी, कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता यावी आणि कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी पालिकेने माहिती आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत नागरिकांना सेवा-सुविधा दिल्या आहेत. आजघडीला पालिकेच्या तब्बल ६० सेवा ऑनलाइन उपलब्ध असून लवकरच अन्य ५३ सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 3:37 am