शैलजा तिवले, संदीप आचार्य

परळच्या केईएम रुग्णालयात झालेल्या मेंदूतील गाठीच्या (ब्रेन टय़ूमर) जटिल शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण लंडनच्या ब्रिटिश फिल्म इन्स्टिटय़ूट येथे आयोजित केलेल्या जागतिक ब्रेन टय़ूमर कोर्समध्ये गुरुवारी केले गेले. चीन, इटली, जर्मनी, अमेरिका इत्यादी देशांमधील निष्णात आठ न्युरोसर्जनच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात केले.

मेंदू हा मानवी शरीराचा अत्यंत गुंतागुतीचा भाग आहे. शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण या भागातून केले जाते. मेंदूच्या कोणत्याही भागात आलेली गाठ काढणे अवघड असते. या शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही धमनीला इजा झाल्यास शरीरातील अवयवाच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया जटिल असून त्या सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू असते. याचाच एक भाग म्हणून जगभरातील न्युरोसर्जनच्या प्रात्यक्षिकांसह शस्त्रक्रियेचे तंत्र शिकविण्यासाठी दरवर्षी लंडनमध्ये जागतिक कार्यशाळा भरविली जाते. या वर्षी ही कार्यशाळा १८ ते २१ जुलै या कालावधीत होत आहे. या कार्यशाळेसाठी जगभरातील ३५० न्युरोसर्जन सहभागी झाले आहेत.

कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आठ तज्ज्ञ न्युरोसर्जनांनी मेंदूत विविध ठिकाणी येणाऱ्या गाठ काढण्याचे तंत्र त्यांच्या रुग्णालयातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून समजावले.  केईएमच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल गोयल यात सहभागी झाले होते. प्रथम चीनमधील शांघाय येथे झालेल्या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण लंडनच्या ब्रिटिश इन्स्टिटय़ूटमधील मोठय़ा पडद्यावर केले गेले. त्यानंतर इटली येथून सादरीकरण केले.

तिसऱ्या शस्त्रक्रियेचे प्रक्षेपण हे भारतातून केले गेले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही शस्त्रक्रिया केईएममध्ये सुरू झाली. ‘कवटीच्या आतील बाजूस (स्कल बेस टय़ूमर) आलेली गाठ काढणे अत्यंत अवघड असते. या भागाची रचना गुंतागुंतीची असते. ही गाठ व्यवस्थित काढली तर रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया असून याची पद्धती जगासमोर मांडली गेली. मेंदूमध्ये विविध ठिकाणी गाठी येतात. त्यातील काही गाठी सहजपणे काढणे शक्य असते. परंतु मेंदूच्या आतील बाजूस असणारी गाठ, तिचे ठिकाण, तिच्या जवळपास असणाऱ्या धमन्या, रक्तवाहिन्या, त्यांच्याशी जोडलेले शरीराचे निरनिराळे अवयव अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची गाठ काढण्याचे विशिष्ट तंत्र आहे. यातील एक तंत्र जगासमोर मांडले गेले, असे डॉ. गोयल यांनी सांगितले. डॉ. गोयल हे केईएमच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख असून आतापर्यंत त्यांनी अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया ३०० वेळा केल्या आहेत.