विमानतळाच्या जागेतील सुमारे ८० हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पहिले पाऊल टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधकांना शह दिला आहे. विमानतळ झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (एमआयएएल) यांच्यात २ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (एचडीआयएल)ने बांधलेल्या १८ हजार घरांच्या वितरणासाठी पुढील २१ दिवसांमध्ये लॉटरी काढण्यात येईल व तीन महिन्यांमध्ये मोफत घरवाटप केले जाईल, असे भाजप खासदार पूनम महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

विमानतळ झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले काही वर्षे रखडला असून त्यांना मोफत घरे देण्याचे आश्वासन भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीच्या वेळी दिले होते. पण सर्वेक्षण रखडले, पर्यायी जागा दाखविल्याशिवाय सर्वेक्षण करू दिले जाणार नाही, अशी रहिवाशांची भूमिका होती. घरे बांधण्याचे काम दिलेल्या एचडीआयएलने कुर्ला येथे १८ हजार घरे बांधली व एमआयएलशी वाद निर्माण झाल्याने ते काम पूर्ण झाले नाही. ही घरे निकृष्ट दर्जाची असून अनेक वर्षे पडून राहिल्याने त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तर विमानतळ परिसरातील हजारो रहिवाशांना त्यांच्या जागेच्या परिसरातच (इनसीटू) पुनर्वसन हवे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, एमआयएएल, एसआरए व इतर संबंधितांकडे मी गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. सर्वेक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात एचडीआयएलने कुर्ला येथे प्रीमियर प्रकल्पात बांधलेली घरे क्रांतीनगर, संदेशनगर, सेवकनगर, जरीमरी या पट्टय़ातील रहिवाशांना कायमस्वरूपी मोफत दिली जातील, अशी माहिती महाजन यांनी दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये ५०० चौ. फुटांची घरे देण्याचे जाहीर केल्यावर भाजपने तातडीने हालचाली करून सामंजस्य करार मार्गी लावला व घाईघाईने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरवाटप केले.

२७६ एकर जागेवर अतिक्रमण

विमानतळाच्या २७६ एकर जागेवर अतिक्रमण असून त्यावर सुमारे ८० हजार झोपडय़ा आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी एमआयएएल व एचडीआयएलमध्ये १५ ऑक्टोबर २००७ रोजी करार करण्यात आला होता. कुर्ला प्रीमियर प्रकल्पात ३० इमारती असून २७ इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात एकूण १८ हजार ६४५ सदनिका उपलब्ध आहेत, मात्र त्यापैकी ३८१७ सदनिकाच सध्या वितरणासाठी उपलब्ध आहेत व त्यापैकी ९३ सदनिका प्रातिनिधिक वितरणासाठी देण्यात आल्या आहेत, असे एसआरएच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

‘विमानतळ झोपडपट्टीवासीयाला २०२२ पर्यंत घर’

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास योजनेत घर दिले जाईल व त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कुर्ला येथे दिली. विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांना कुर्ला येथील एचडीआयएलने बांधलेल्या घरांची चावी देण्याचा प्रातिनिधिक कार्यक्रम सोमवारी झाला. या वेळी खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार पराग अळवणी, झोपु प्राधिकरणाचे मुख्याधिकारी दीपक कपूर, जीव्हीकेचे मुख्याधिकारी राजीव जैन आदी उपस्थित होते.