अंधेरी येथील डीएन नगर सोसायटीच्या आठ इमारतींमधील ४८० सदनिकांचे बांधकाम वगळून विकावयाच्या अन्य सदनिकांच्या बांधकामास स्थगिती देण्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत मंगळवारी जाहीर केले. या सोसायटीतील इमारतींचे बांधकाम क्षेत्रफळ आणि अन्य बाबींमध्ये गैरव्यवहार झाल्याने विकासकाविरुध्द  फौजदारी कारवाई करुन अटक करावी आणि बांधकामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली.

आरिफ नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, अबू आझमी यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री मेहता म्हणाले, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी २००५ मध्ये विकासक म्हणून वैदेही आकाश हाऊसिंग प्रा.लि. ची निवड करण्यात आली होती. त्यांनी रुस्तमजी रिअल्टी प्रा.लि. शी करार केला. विकासकांनी रहिवासी व व्यापारी गाळ्यांसाठी केलेले करार, मनोरंजन उद्यानाचे क्षेत्र भूपृष्ठावर न ठेवता पोडियमवर ठेवणे व अन्य बाबींमध्ये गैरप्रकार झाले आहेत.