जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी एका तरुणाच्या शरिरातून आरपार गेलेली सळई यशस्वीपणे ऑपरेशन करुन बाहेर काढत त्याला जीवनदान दिलं आहे. नाशिकमधील ३३ वर्षीय सलीम शेख याच्या शरिरातून गेलेली सळई जवळपास दोन तास तशीच होती. इतकंच नाही तर त्याच परिस्थितीत त्याला नाशिक ते मुंबई असा २०० किमीचा प्रवास करावा लागला. सळई बाहेर काढण्यासाठी जे जे रुग्णालयाच्या १० डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. अनेक तासांच्या परिश्रमानंतर अखेर डॉक्टरांना सळई काढण्यात यश मिळालं. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांमुळे सलीम शेखला नवं आयुष्यच मिळालं आहे.

रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम मुळचा नाशिकमधील लासलगावचा राहणारा आहे. मजूर म्हणून तो काम करतो. दरदिवशीप्रमाणे त्यादिवशीही सलीम एका इमारतीच्या बांधकामात व्यस्त होता, त्यावेळी अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. खाली उभ्या असलेल्या एका सळईवर पडल्याने सलीमच्या मांडीतून घुसून सळी यकृत, पोट आणि छाती फाडत खांद्यातून बाहेर निघाली. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

सर्जरी विभागातील डॉक्टर अमोल वाघ यांनी सांगितलं आहे की, ‘सलीमच्या शरिरात घुसलेली सळई मांडीतून घुसून खांद्यातून बाहेर निघली होती. ४ फुटांची ही सळई आतडं, यकृत आणि पोट फाडत गेली होती. अशा परिस्थितीत सळई काढणं फार जोखमीचं होतं. सर्व तपासण्या केल्यानंतर सळई अत्यंत नाजूकपणे बाहेर काढण्यात आली. सळई काढल्यानंतर पेशंटची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात त्याला डिस्चार्ज दिला जाईल’.