नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना गेल्या एक महिन्यापासून हेपेटायटीस-ईची लागण होत असल्याचे उघड झाले आहे. रुग्णालय परिसरात असलेल्या पिण्याच्या पाण्यामुळे या डॉक्टरांना लागण झाल्याचे बोलले जात आहे. यावर नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मात्र थेट बोलणे टाळले असून रुग्णालय प्रशासनाच्या दबावामुळे निवासी डॉक्टर बोलत नसल्याची चर्चा होत आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्याचे सांगून रुग्णालयातील पाण्यामुळे हा प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले.
शनिवारी एका रुग्णसेविकेला आंतररुग्ण विभागातून सोडण्यात आले असून दोन निवासी डॉक्टर अद्याप उपचार घेत आहेत. याप्रकरणी, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रवीण नारकर म्हणाले की, असे प्रकार वारंवार होत असून यावर रुग्णालय प्रशासनाकडून काळजी घेतली जात नाही. तसेच मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी यावर ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रुग्णालय परिसरातील २४ पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून त्या क्लोरिनेशन करून स्वच्छ करण्यात आल्या त्यामुळे याचा दोष रुग्णालयाला देणे योग्य होणार नाही असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भरमल यांनी स्पष्ट केले आहे.