मध्य रेल्वे रखडण्याचे नवे कारण

उपनगरीय गाडय़ांच्या टपावर बसून वेगवेगळ्या प्रकारची स्टंटबाजी करणारे ‘टपोरी’ ही रोजच्या प्रवाशांसाठी नित्याचीच बाब. यापैकी एखादा ‘टपोरी’ प्रवासी उपनगरीय गाडीच्या डोक्यावर असलेल्या विद्युतभारीत वायरीला चिकटून जळून खाक झालाच तर व्यक्त केली जाणारी हळहळही नेहमीचीच. तेवढे एक कारणही उपनगरीय गाडय़ांची वाहतूक खोळंबण्यास पुरेसे ठरते. एरवी या वायरीला कावळा, कबुतर किंवा अन्य कोणताही पक्षी चिकटला तरी वाहतूक काही खोळंबत नाही. परंतु बुधवारचा दिवस त्यास अपवाद ठरला. कारण थेट कुत्र्यानेच पुलावरून उडी मारल्याने उपनगरीय गाडीच्या डोक्यावरील वायरच अंमळ थरारली आणि काम करेनाशी झाली, सबब सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक मंदावली. आणि हा सर्व प्रकार घडला मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान. उडी मारणारा कुत्रा जळून कोळसा झाला हे वेगळे सांगायला नकोच..

कल्याण स्थानकानजीक पत्री पुल हा रेल्वेमार्गाला छेदून जाणारा पुल आहे. या पुलावर असलेल्या एका कुत्र्याला तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न काही जण करत होते. त्यामुळे भेदरलेल्या या कुत्र्याने जिवाच्या आकांताने थेट पुलावरूनच खाली रेल्वेमार्गावर उडी मारली. मात्र, कुत्र्याची ही उडी चुकली. तो थेट पडला उपनगरीय गाडीच्या डोक्यावरील विद्युतभारीत वायरीवर. त्याचवेळी तेथून धिम्या मार्गावरून डाऊन दिशेला एक उपनगरीय गाडी जात होती. कुत्रा वायरीवर पडायला, वायरीतला विद्युतप्रवाह खंडित व्हायला आणि गाडी यायला यांची वेळ एकत्र जुळून आली, परिणामी गाडय़ांच्या खोळंब्यास सुरुवात झाली. सकाळी सव्वासातच्या सुमारासच हा सर्व प्रकार घडला. विद्युतभारीत वायरीतील विद्युतप्रवाहच खंडित झाल्याने उपनगरीय गाडय़ा शक्तिपात झाल्यासारख्या एकामागोमाग एक जागीच उभ्या राहिल्या. त्यातच वायरीत अडकलेल्या कुत्र्याचा गतप्राण देह बाजूला काढण्यासाठी सुमारे अर्धा तास कल्याण-ठाकुर्लीदरम्यानचा डाऊन दिशेचा धिम्या मार्गावरील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. डाऊन दिशेला झालेल्या या खोळंब्याची लागण अप दिशेलाही झाली. त्यामुळे अप दिशेला जाणाऱ्या गाडय़ाही १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या. अखेर पावणेआठच्या सुमारास कुत्र्याचे शव बाजूला करून वीज पुरवठा पूर्ववत केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाच.