इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि मूळ डोंबिवलीचे असलेल्या मयुर कार्लेकर उर्फ मॅक यांच्या घरावर काही स्थानिकांनी हल्ला केला. घराबाहेर असलेल्या त्यांच्या गाडीला पेटवण्यात आलं, तसेच बगिचातही जाळपोळ करण्यात आली. मॅक कार्लेकर हे इंग्लंडमध्ये डिजीटल कन्सल्टंट म्हणून काम करतात. ते 19 वर्षांपूर्वी टेक महिंद्रासोबत काम करण्यासाठी इंग्लंडला गेले होते, त्यानंतर तिथेच ते स्थायिक झाले.

चौघा स्थानिकांनी द्वेषातून हा हल्ला केल्याचा आरोप मयुर यांनी केला आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन मयुर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. इंग्लंडमधील केंट येथे त्याचं घर आहे. शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या घराबाहेर चार जणांनी धुडगुस घातला, बगिचाचे नुकसान केले आणि त्यांची कार देखील पेटवली. हल्ला झाला त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा-मुलगी घरात झोपले होते. शेजारच्यांनी फोन करून त्यांना घराबाहेर सुरू असलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली, त्यामुळे ते सर्व कुटुंबियांसह सुरक्षितरित्या बाहेर पडले.

या घटनेनंतर पोलिसात तक्रार देतानाही त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तक्रारीची दखल घेण्यासाठी 32 तास लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतके वर्ष येथे राहिल्यानंतर पहिल्यांदाच इतका भयंकर अनुभव आल्याचं मयुर म्हणाले. या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसला असून आपलं राहतं घर सोडण्याच्या विचारात आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ –