‘रोजी’त खंड आल्याने ‘रोटी’चाही पेच

मुंबई : करोना संसर्ग कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून घरकामगारांना सूट देण्यात आली असली तरी, त्यांच्या प्रवासास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबईतील झोपडपट्टी, वस्त्यांमधून बऱ्याच महिला उच्चभ्रू भागात घरकामासाठी जातात. सध्या लोकल आणि बसमध्ये या महिलांना प्रवासबंदी असल्याने त्यांचे काम बंद झाले आहे. परिणामी कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न त्यांच्या पुढे आहे.

झोपडपट्टी आणि सामान्य वस्त्यांमधील, परिस्थितीने गांजलेल्या, शिक्षणाचा अभाव असलेल्या अनेक महिला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटत असतात. नोकरी- व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्यांच्या घरी बहुसंख्य महिला घरकाम करण्यासाठी जातात. अगदी घरच्या जेवणापासून ते स्वच्छतेपर्यंत सगळी कामे त्या आपुलकीने करीत असतात. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत सोसायटय़ांनी घातलेल्या बंदीमुळे त्यांच्या कामात खंड पडला होता. तर यंदा प्रवासावर असलेल्या निर्बंधांमुळे या महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंधेरी, बोरिवलीतील मोठय़ा सोसायटय़ांमध्ये जोगेश्वरी, मालाड भागांतील, तर दहिसर आणि परिसरात विरार, नालासोपारा भागांतून महिला कामासाठी येतात. मुंबईतही धारावी, कुर्ला, घाटकोपर इथे राहणाऱ्या महिला दादर , वांद्रे ते अगदी मलबार हिलपर्यंत जातात. दिव्यातून डोंबिवली, कल्याण, ठाणे भागांत घरकामासाठी येणाऱ्या महिलांचीही मोठी संख्या आहे. सध्या लोकल आणि बेस्ट बसेसमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असल्याने या महिला कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे आता घरखर्च कसा भागवायचा या विचाराने त्या हवालदिल झाल्या आहेत.

‘पती कंत्राटदाराकडे मजुरी करत होते. सध्या त्यांचेही काम बंद झाले आहे. मी ठाण्यातील काही घरांमध्ये धुणे आणि भांडय़ाचे काम करते. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत मी तिथेच आसपासच्या घरांमध्ये काम करून महिना १२ हजार रुपये मिळवते. आता प्रवासावर बंदी असल्याने काम बंद झाले आहे. त्यामुळे स्थानिक भागात कुठे काही काम मिळतेय का याचा शोध घेत आहे,’ अशी व्यथा दिव्यातील पुष्पा कदम यांनी मांडली. घरकाम करणाऱ्या कित्येक महिला एकल असून छोटी-मोठी कामे करून त्या आपला उदरनिर्वाह चालवितात. दैनंदिन गरजा, आजारपण यात तारांबळ होत असल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली आहे.

‘आमच्याकडे येणाऱ्या मावशी विरारहून येतात. आमच्याच सोसायटीतील चार-पाच घरांमध्ये त्या काम करतात. सध्या प्रवासबंदीमुळे त्यांना येणे शक्य नसल्याने अनेक घरांचा दिनक्रम बिघडला आहे. प्रत्येकाला विविध अडचणी असल्याने या महिलांची नितांत गरज भासते. तसेच त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न असल्याने सरकारने या महिलांना प्रवासाची परवानगी द्यावी,’ असे दहिसर येथील एका गृहसंस्थेतील एका पदाधिकाऱ्याने म्हणणे आहे.

वृद्ध आणि आजारी माणसांचे हाल

बऱ्याच घरांमध्ये वृद्धापकाळाने थकलेल्या किंवा आजारी व्यक्तींना घरकामासाठी या महिलांवर अवलंबून राहावे लागते. प्रवासबंदीमुळे त्या येऊ न शकल्याने अशा व्यक्तींचा खोळंबा झाला आहे. कित्येक घरांमध्ये जेवण बनवणाऱ्या महिला येऊ न शकल्याने त्यांना उपाहारगृहांची वाट धरावी लागली आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय चित्रा दाते यांच्या घरी काम करणारी महिला धारावीतून येते. पूर्वी त्या बसमधून येत होत्या. परंतु कठोर निर्बंध लागू झाल्याने त्यांना वांद्रे येथे जाणे मुश्कील झाले होते. दाते यांची प्रकृती फारशी बरी नसल्याने अखेर त्यांनी स्वत:ची गाडी पाठवून त्या महिलेला कामावर आणण्याचा निर्णय घेतला.