पावसाळ्यात मुंबईतील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी भारतीय हवामान खात्यातर्फे (आयएमडी) नेमक्या कुठल्या तंत्रज्ञाचा वापर केला जातो, डॉप्लर रडार का बंद आहे, ते कार्यान्वित करण्यात येणार की नाही आणि परदेशात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान का वापरले जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयाने आयएमडीला त्यावर तपशीलवार उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे लोकल सेवा बंद पडली असल्यास त्याबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडे आहे का आणि नसल्यास त्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असा सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी उपस्थित केला व त्यावर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. यंदा पहिल्याच पावासाने संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. त्यामुळे ही परिस्थिती का उद्भवली याची चौकशी करण्याचे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश पालिकेला देण्याची मागणी करणारी याचिका अटल दुबे यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने आयएमडी आणि रेल्वे प्रशासनाला हे आदेश दिले.