स्टॉलवरील पुस्तकांच्या संख्येत घट;नोटाबंदीचा फटका बसण्याची धास्ती

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असलेल्या आंबेडकरी अनुयायांचा ओघ यंदाही मोठा आहे. मात्र, केंद्र सरकारने ५०० व एक हजाराच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या चलनकल्लोळाचा फटका येथील व्यवहारांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच दर वर्षी विक्रमी पुस्तक विक्रीची परंपरा असतानाही अनेक पुस्तक विक्रेत्यांनी यंदा मर्यादित पुस्तकांचा साठा आपल्यासोबत आणून येथे त्यांची विक्री मांडली आहे.

निश्चलनीकरणाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रहिवाशांना व तेथील व्यवसायांना बसतो आहे. शिवाजी पार्कवर येणारे अनुयायी हे मोठय़ा प्रमाणात खेडेगावातून येत असल्याने अनेक जण उसनवारी पैसे घेऊन मुंबईत दाखल होत आहेत. सुदैवाने रेल्वेप्रवास मोफत असल्याने आम्ही येथे पोहोचू शकलो, असे काही अनुयायांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठय़ा प्रमाणात पुस्तके, बाबासाहेबांच्या छायाचित्रांची येथे विक्री होत असते. मात्र या वर्षी या व्यवसायावरही परिणाम जाणवतो आहे. चलनकल्लोळामुळे पुस्तके विकली जातील की नाही, या भीतीने अनेकांनी कमी  पुस्तकांचा साठा आणल्याचे एका पुस्तक विक्रेत्याने सांगितले.

चलनकल्लोळाचा परिणाम शेतकऱ्यांच्या व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. कापूस आणि सोयाबीनच्या मालाला व्यापारी जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा देत आहेत. त्यामुळे आमचा माल पडून आहे. तसेच निश्चलनीकरणामुळे व्यापाऱ्यांकडे पैसा नसल्याने अनेकांना फार कमी भाव मिळाला. आमचा माल तसाच पडल्याने शेजाऱ्यांकडून उसनवार पैसे घेऊन मुंबईत दाखल झालो आहोत.

– मधुकर इंगळे, मुक्ताईनगर, जळगाव</strong>

नागपूरवरून आम्ही दर वर्षी मोठय़ा प्रमाणात पुस्तके आणतो. या वर्षी मात्र त्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी केले आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुस्तकांची विक्री होईल की नाही या भीतीने या वर्षी फार कमी पुस्तके विक्रीला ठेवली आहेत.

– भारत वाघमारे, प्रबुद्धभारत पुस्तकालय आणि प्रकाशन

उत्तर प्रदेशहून येताना थोडेफार सुटे पैसे घेऊन आलो होतो. मात्र दोन हजारांच्या नोटाही आहेत. खाण्याची सोय नसल्याने सुटे होतील का?

– सुशीलकुमार, उत्तर प्रदेश