मिठी नदीतील ९० टक्के गाळ काढल्याचा पालिकेचा दावा

नालेसफाई पन्नास टक्केही झाली नसल्याबद्दल महापौरांनी फटकारले असतानाच प्रशासनाने मात्र नाल्यातील ७० टक्के गाळ काढला गेल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी मिठी नदीतील ९० टक्के गाळ काढल्याचेही प्रशासनाने लेखी उत्तरात नमूद केले. त्यामुळे पालिकेच्याच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये नाल्याच्या गाळावरून पुढील काळात वाद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात पूर्व उपनगरांमध्ये ९० हजार मीटरचे, पश्चिम उपनगरात १ लाख ४२ हजार मीटरचे तर दक्षिण भागात १६ हजार मीटरचे मोठे नाले आहेत. याशिवाय २० हजार मीटर लांबीच्या मिठी नदीतील गाळही काढला जातो. यावर्षी मोठय़ा नाल्यांमधील ५ लाख टन आणि लहान नाले, गटारे यामधील सुमारे २ लाख टन गाळ काढण्यासाठी १५४ कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. नाल्यांमधील ६० टक्के गाळ ३१ मे पूर्वी काढला जाणार आहे. उर्वरित २० टक्के गाळ पावसाळ्यात व २० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जाईल. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार पावसाळ्यापूर्वी अपेक्षित असलेल्या ६० टक्के नालेसफाईपैकी पूर्व उपनगरातील नाल्यांमधून ७५ टक्के, पश्चिम उपनगरातील नाल्यांमधून ६० टक्के तर दक्षिण भागातून ४३ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे.

आतापर्यंत शहरातून सरासरी ६८ टक्के गाळ काढण्यात आला असून मिठी नदीतील ९० टक्के गाळ काढल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.