रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाला पूर्णवेळ सचिव नाही, मंडळाचे अधीक्षक सुट्टीवर, अध्यक्ष चित्रिकरणात व्यग्र यामुळे मंडळाला कोणीच वाली नसल्याच्या वृत्तांनी जोर धरला होता. याची दखल घेत सांस्कृतिक कार्यखात्याने तातडीने मंडळाचा अतिरिक्त कार्यभार मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी अभिजीत तेलवेकर यांच्याकडे सोपवला आहे.
रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाला पंधरा दिवसांपासून पूर्णवेळ सचिव नाही. मंडळाचा अतिरिक्त कार्यभार काही दिवसांकरता मनोज सानप यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु, त्यांची मूळ खात्यात बदली झाल्यामुळे पुन्हा मंडळाचा कार्यभार कोण हाकणार, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मंडळाचे अधिक्षक दिलीप वाघमारे सुट्टीवर आहेत तर अध्यक्ष अभिनेता अरूण नलावडे सतत चित्रिकरणात व्यग्र असल्याने ते कार्यालयात फार कमी वेळा उपस्थित असतात. या सगळ्या कारणांमुळे मंडळाच्या कारभाराचा बोजवारा उडाला होता.