शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टंचाईग्रस्त जनतेला, तसेच जनावरांना दिलासा मिळेल, ठोस कृती कार्यक्रम राज्य शासनाने हाती घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. या संदर्भात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र आणि त्यासोबत दुष्काळाच्या संकटाशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचे  टिपणही त्यांना पाठविले आहे.

परतीच्या पावसाने निराशा केल्याने खरिपाचे पीक हातचे गेले असून रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून टंचाईमुळे पशुधनही धोक्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी निश्चित असा कृती कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

उपाययोजना कोण करणार? – धनंजय मुंडे

राज्य सरकारने १५१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. मात्र २५ दिवस झाले तरी सरकारतर्फे कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर केला, पण उपाययोजना कोण करणार, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंडे व राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाचा दौरा केला.