रिलायन्स समूहाच्या ऑस्टीन मार्टीन गाडीच्या गूढ अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत एका आलिशान गाडीने धडक दिल्याची घटना पुढे आली आहे. वरळी येथे एका मर्सिडीज कारने दोन वाहनांना धडक दिल्याने एका महिलेसह दोन जण जखमी झाले. ही मर्सिडीज लोकमत वृत्तपत्र समूहाच्या मालकीची आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री वरळीतील ‘पूर्णा’ या आमदारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीजने प्रथम एका व्ॉगनआरला धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या होंडा सिटी गाडीलाही धडक दिली. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. मर्सिडीजचा चालक शशिकांत भोसले (३५) हा अपघातानंतर पोलिसांसमोर हजर झाला. त्याने मद्यपान केले होते. त्याला वरळी पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर सोडले.
गाडीत चालकाच्या सोबत कोण होते, त्याचा आम्ही तपास करत आहोत, असे पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितले. ही गाडी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या मालकीची आहे. मात्र दर्डा कुटुंबीयांना न सांगता चालक वाहन घेऊन गेला होता आणि गाडीत दर्डा कुटुंबीयांपैकी कुणी नव्हते, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी दिली. अपघातात व्ॉगनआरमधील स्नेहा रसाळ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.