एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यास विरोधी पक्ष भाजपने आक्षेप घेतल्यानंतरही या पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्याची घोषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. शिवसेनेने माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी दिली असून, भाजपने भाई गिरकर यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता, गोऱ्हे यांच्या निवडीची औपचारिकता असेल.

उपसभापतिपदाची निवडणूक घेण्याची घाई कशासाठी असा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. उपसभापतिपदाची निवडणूक कधी घ्यायची हा सभापतींचा अधिकार असल्याकडे नाईक-निंबाळकर यांनी लक्ष वेधले.

 विधान परिषदेतील संख्याबळ

विधान परिषदेच्या १८ जागा सध्या रिक्त आहेत. यामुळे  सभागृहाचे संख्याबळ सध्या ६० आहे. यामुळे विजयासाठी ३१ मतांची आवश्यकता असेल. शिवसेना १४, राष्ट्रवादी नऊ, काँग्रेसचे आठ असे महाविकास आघाडीचे संख्याबळ ३१ आहे. याशिवाय शेकापचे दोन, लोकभारती आणि एका अपक्षाचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा आहे. भाजपचे २२ आमदार असून, राष्ट्रीय समाज पक्ष आणि दोन अपक्षांचा पाठिंबा आहे. यामुळे सत्ताधारी पक्षासाठी निवडणुकीत अडचण येणार नाही. यातूनच बहुधा ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

टाळेबंदी असताना विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुका झाल्या त्या वेळी भाजपने चार जागांवर आपले उमेदवार देत त्यांना आमदार केले. त्या वेळी तुम्हाला करोनाची अडचण वाटली नाही. आता  विधिमंडळाचे अधिवेशन होत असताना त्यात उपसभापतिपदाच्या निवडणुकीला कसा काय आक्षेप घेता, असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सुनावले.

करोना योद्धय़ांना शहिदांचा दर्जा द्या -दरेकर

करोनाकाळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या करोना योद्धय़ांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  सभागृहात केली. दरेकर म्हणाले, पत्रकार पांडुरंग रायकर यांचे नुकतेच करोनाने निधन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा.