माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १२ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचा या जागेवर डोळा असला तरी राज्याबाहेरील काही नेत्यांच्या नावाची या जागेसाठी चर्चा होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल व अर्ज भरण्याची मुदत २ जानेवारीपर्यंत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी आहे. राज्यातून राज्यसभेवर जाण्याकरिता एका बडा ठेकेदार बरीच खटपट करीत आहे. काँग्रेसमध्ये रोहिदास पाटील, नरेश पुगलिया, उत्तमसिंह पवार आदी नेते प्रयत्नशील आहेत. देशमुख यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत असल्याने मराठवाडय़ातील नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. यासाठी बीडच्या रजनी पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व राजीव गांधी फाउंडेशनचे पदाधिकारी सुखदेव थोरात यांच्या नावाची चर्चा झाली होती. राज्यातील एका जागेवर राज्याबाहेरील नेत्याची वर्णी लावण्याची काँग्रेस हायकमांडची योजना आहे. यापूर्वी राजीव शुक्ला  यांना दोनदा राज्यातून राज्यसभेवर पाठविण्यात आले.