राज्यभरात ५०० केंद्रांची उभारणी

विद्युत वाहनांच्या चार्जिग केंद्राच्या वीजदरासाठी वेगळा गट निश्चित केल्यानंतर आता राज्यभरातील आपल्या उपकेंद्रांलगतच्या जागेत ५०० चार्जिग केंद्रे उभारण्याचे महावितरणने ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांत ५० चार्जिग केंद्रे उभारण्यात येतील.

केंद्र सरकारने विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यासाठी धोरण जाहीर केले. त्यामुळे भविष्यात विद्युत वाहनांची संख्या वाढणार हे लक्षात घेऊन महावितरणने नुकत्याच मंजूर झालेल्या नवीन वीजदर पत्रकात विद्युत वाहनांच्या चार्जिग केंद्रासाठी वेगळा गट प्रस्तावित केला होता. राज्य वीज नियामक आयोगाने तो मंजूर करत ६ रुपये प्रति युनिट असा दर निश्चित केला.

आता महावितरणने राज्यभरात ५०० विद्युत चार्जिग केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत ४, ठाण्यात ६, नवी मुंबईत ४, पनवेलमध्ये ४, पुण्यात १०, मुंबई-पुणे महामार्गावर १२ आणि नागपूरमध्ये १० अशा रीतीने ५० विद्युत चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात कार्यादेश काढण्यात येणार आहे. नागपूर येथील अमरावती रस्त्यावरील उपकेंद्रात आणि पुण्यातील एका उपकेंद्रात प्रत्येकी एक डीसी चार्जिग केंद्र उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित होईल.

अडीच लाखांचा खर्च

एका चार्जिग केंद्रासाठी महावितरणला सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च येत आहे. एका वाहनाला पूर्ण चार्जिग करण्यासाठी पाऊण तास ते एक तासाचा वेळ लागतो. वाहनधारकांना प्रत्येक युनिटसाठी सहा रुपये मोजावे लागतील. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वीजदरात दीड रुपयांची सूट मिळणार आहे, असे महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.