कोराडी वीजप्रकल्पात ३१ वर्षांपासून सुरू असलेल्या २१० मेगावॉटच्या संचाचे नूतनीकरणाचा करार करणाऱ्या ‘महानिर्मिती’ने आपली औष्णिक वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी आणखी नऊ २१० मेगावॉटच्या संचांसाठी अशा नूतनीकरणाची योजना आखली आहे. त्यामुळे एकूण २१०० मेगावॉटच्या वीजसंचांचे आयुष्य सुमारे १५ वर्षांनी वाढणार असून वीजनिर्मितीही वाढणार आहे. तब्बल ५१७० कोटी रुपयांची ही योजना आहे.
‘महानिर्मिती’ची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ७४८० मेगावॉट आहे. त्यातील बरेच वीजसंच हे २५ ते ३० वर्षांपेक्षा अधिक जुने झाले आहेत. त्यामुळे या संचांची वीजनिर्मिती क्षमता कमी झाली आहे. परिणामी वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्रकल्पांच्या उभारणीबरोबरच नूतनीकरणाच्या पर्यायाचा मार्ग ‘महानिर्मिती’ने चोखाळला आहे.
नवीन वीजसंच उभारण्यासाठी किमान चार वर्षांचा अवधी जातो. पण नूतनीकरणाचे काम आठ ते दहा महिन्यांत होते. शिवाय नवीन संचाच्या तुलनेत खर्चही कमी असतो. नूतनीकरणामुळे वीजसंचाचे आयुर्मान १५ ते २० वर्षांनी वाढते. तसेच संच जुनाट झाल्याने कमी झालेली कार्यक्षमताही वाढते आणि वीजनिर्मितीचे प्रमाण वाढते. या नूतनीकरण प्रकल्पांतर्गत कोराडीच्या २१० मेगावॉटच्या संचाचे नूतनीकरण ‘भेल’ या सरकारी कंपनीमार्फत करण्यात येत आहे. मे २०१५ पासून हे काम प्रत्यक्ष सुरू होईल. या संचाबरोबरच कोराडी येथील २१० मेगावॉटचे आणखी दोन, नाशिक वीजप्रकल्पातील तीन, भुसावळ येथील एक, परळीमधील एक आणि चंद्रपूर येथील दोन अशारितीने २१० मेगावॉटच्या एकूण दहा संचाचे नूतनीकरण करण्याचे नियोजन ‘महानिर्मिती’ने केले आहे. त्यापोटी ५१७० कोटी रुपये खर्ची पडणार आहेत.
राज्यातील एकूण वीजपुरवठय़ात ‘महानिर्मिती’चा वाटा आता ५० टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. अशावेळी वीजनिर्मिती क्षमता वाढवून आपला टक्का शाबीत राखण्यासाठी ‘महानिर्मिती’ची धडपड सुरू झाली आहे. ‘महानिर्मिती’चा हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास राज्याकडे हक्काची वीज उपलब्ध असणार आहे.