|| प्रसाद रावकर

विद्युतपुरवठा कसा होतो याबाबत अनभिज्ञ

अनधिकृत फेरीवाल्यांना विद्युतपुरवठा कसा होतो याबाबत पालिकेकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा माग आपल्या यंत्रणेला कामाला लावून घेण्याऐवजी ‘ग्राहक आणि संधारण क्रमांक दिल्यास माहिती देऊ’, असे अफलातून उत्तर देऊन ‘बेस्ट’ने बोळवण केली आहे. पालिकेच्या तक्रारीवरून ‘बेस्ट’ने मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांकडील वीजपुरवठय़ाचा शोध घेतला असता तर वीजचोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले असते, परंतु अनधिकृत फेरीवाल्यांकडील वीजपुरवठय़ाबाबत दस्तुरखुद्द बेस्टच बेफिकीर असल्याचे माहिती अधिकाराच्या उत्तरावरून उघड होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईमधील पदपथांवर ठाण मांडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचे ठेले विजेच्या दिव्यांनी झगमगून गेलेले दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना विद्युतपुरवठा कसा केला जातो याचे कोडे पालिकेला पडल्याने त्याची माहिती मिळविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी बेस्टकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. मात्र फेरीवाल्यांकडील वीजपुरवठय़ाचा माग घेण्याऐवजी ग्राहक क्रमांक आणि संधारण क्रमांक दिल्यास माहिती उपलब्ध करण्यात येईल, असे उत्तर बेस्टने पालिकेला दिले.

पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त  उदयकुमार शिरुरकर यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत बेस्ट उपक्रमाकडे अर्ज करून माहिती मागविली होती. मोहम्मद अली रोड, डॉ. महेश्वरी रोड, कांबेकर स्ट्रीट, युसूफ मेहेर अली रोड, टी. एम. र्मचट रोड, सारंग स्ट्रीट, नागदेवी रोड, चकाला शरीफ देवजी मार्ग, जंजीकर रोड, नारायण कोळी रोड, काझी सय्यद रोड, नरसीनाथा रोड, संत तुकाराम रोड, अब्दुल रेहमान स्ट्रीट, नौरोजी हिल रोड, सरदार वल्लभभाई रोड, शाहिदा रोड, हजरत अब्बास स्ट्रीट, कोळसा स्ट्रीट, तवा स्ट्रीट, नारायण धुरू रोड या परिसरांत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावरच पथाऱ्या पसरल्या आहेत. या फेरीवाल्यांचे ठेले संध्याकाळनंतर विजेच्या दिव्याने उजळून निघतात. त्यामुळे या सर्व रस्त्यांवरील फेरीवाल्यांना करण्यात येत असलेल्या विद्युतपुरवठय़ाबाबतची कागदपत्रे सादर करावी, नसल्यास रस्त्यावरील फेरीवाल्यांना मिळालेल्या वीज जोडणीची माहिती द्यावी, जवळच्या बेस्टच्या ग्राहकाकडून फेरीवाल्याला वीज देण्यात येत असल्यास त्यासाठी दिलेल्या परवानगीची कागदपत्रे द्यावी, परवानगी दिलेली नसेल तर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, वीजचोरीबाबत केलेल्या कारवाईची कागदपत्रे सादर करावी, अशी माहिती उदयकुमार शिरुरकर यांनी १९ एप्रिल रोजी बेस्टकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून मागितली होती. या अर्जावर एक महिन्याने म्हणजे १८ मे रोजी बेस्टने पालिकेला उत्तर धाडले.

वीज जोडणी संबंधाने संगणकीय प्रणालीमध्ये ‘फेरीवाल्यांसाठी’ या स्वरूपाची वेगळी व्यवस्था नाही. त्यामुळे वीजजोडणीबाबत फेरीवाल्यांशी संबंधित माहिती मिळत नाही. बेस्टकडे उपलब्ध असलेली माहिती ही ग्राहक क्रमांक, वीजमापक क्रमांक, संधारणा क्रमांक इत्यादींच्या आधारे शोधण्यात येते. आपण विचारलेली माहिती विस्तृत स्वरूपाची असल्याने ती संकलित करून देणे माहितीच्या अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही, असे बेस्टने उत्तरात म्हटले आहे. तरीही आपल्याला माहिती हवी असल्यास ग्राहक क्रमांक, संधारणा क्रमांक उपलब्ध करावा. त्याच्या आधारे आपल्याला माहिती उपलब्ध करण्यात येईल, असेही बेस्टने पालिकेला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.अनधिकृत फेरीवाल्यांना बेस्टकडून वीजपुरवठा करण्यात येत नाही. मात्र तरीही फेरीवाल्यांचे ठेले विजेच्या दिव्यांनी उजळलेले असतात. त्यामुळे फेरीवाल्यांना वीजपुरवठा कुठून होतो, याचा शोध घेण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. बेस्टने या माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाचा आधार घेऊन या रस्त्यांवर शोधमोहीम केली असती तर वीजचोरीचे अनेक प्रकार उघडकीस येऊ शकले असते. परंतु तसे करण्याऐवजी बेस्टने हात झटकण्याचा प्रकार केला आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

बेस्टचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. अशा वेळी वीजचोरीबाबत बेस्टने मोठी मोहीम हाती घेतली तर दंडाच्या स्वरूपात मोठा महसूल मिळू शकेल. त्यासाठी बेस्टने पदपथांवरील फेरीवाल्यांना होणाऱ्या वीजपुरवठय़ाचा माग घेण्याची गरज आहे. महसूल मिळविण्याचा एक पर्याय बेस्टसमोर आहे, परंतु त्यासाठी बेस्ट अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची गरज आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.