मुंबई : मोठय़ा संख्येने बेस्टचे वाहक आणि चालक बाधित होत असल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीत बेस्टचा आरोग्य विभाग काहीच मदत करत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बेस्टच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेणारी पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे.

बेस्टमध्ये ३ मे रोजी ३६ कर्मचारी बाधित होते. तर गेल्या २०-२५ दिवसांत ही संख्या २२० वर गेली आहे. यापैकी ७० टक्के कर्मचारी हे परिवहन विभागातील आहेत.  बेस्टचा उपक्रमाचा आरोग्य विभाग असून त्यात २७ डॉक्टर आहेत. मात्र या आरोग्य विभागाकडून पुरेशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

बेस्टच्या आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. अनिल सिंघल यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बेस्टचे जे २०० कर्मचारी बाधित झाले आहेत, त्यातील प्रत्येकाला आरोग्य विभागाकडून दररोज तीन वेळा दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याचा पाठपुरावा केला जात आहे. या सर्व रुग्णांना त्यांच्या त्यांच्या विभागात रुग्णालयात खाटा, अतिदक्षता विभागात खाटा मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत २० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून जीवनसत्त्वाच्या दहा हजार गोळ्या वाटण्यात आल्या आहेत.

बेस्टचा आरोग्य विभाग हा पारंपरिक पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्र देणे, साधे आजार असतील तर त्यावर उपचार करणे अशीच कामे करत आला आहे. करोनाच्या काळात या विभागाने स्वरूप बदलायला हवे, असे मत बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी मांडले आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी खाजगी रुग्णालयात काही खाटा आरक्षित करायला हव्या होत्या, असेही मत त्यांनी मांडले आहे.

बेस्टमध्ये खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून हलक्या स्वरूपाचे काम मिळवण्याचे प्रकार होत होते. ते मी बंद केले म्हणून आरोग्य विभागाला बदनाम केले जात आहे.

– डॉ. अनिल सिंघल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बेस्ट उपक्रम