शंभरहून अधिक गुंड चकमकीत ठार मारणारे चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा सहा वर्षांनंतर पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले आहेत; मात्र चकमकींवर पोलिसांनी मारलेली फुली आता शर्मा यांच्या पुनरागमनानंतरही तशीच राहिल्यास चकमकींतील वादग्रस्तता पुन्हा चव्हाटय़ावर येणार असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

छोटा राजनचा कुख्यात गुंड लखनभय्या याला खोटय़ा चकमकीत ठार केल्याप्रकरणी न्यायालयाने २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यातून निर्दोष सुटलेल्या शर्मा यांना पोलीस सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नसली तरी ते पुन्हा मुंबई पोलीस दलात येतील, असे बोलले जाते. सेवेची त्यांची अद्याप तीन वर्षे बाकी आहेत. चकमकफेम दया नायक हे याआधीच सेवेत आले असून सध्या आंबोली पोलीस ठाण्यात आहेत. परंतु ते शांत आहेत. शर्मा पुन्हा सेवेत आले तरी त्यांना पूर्वीप्रमाणे चकमकींसाठी परवानगी मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

त्यामुळे यापुढे मुंबईत चकमकी घडण्याची शक्यता कमीच असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. आता फक्त चकमकफेमपैकी फक्त शर्मा आणि नायक हेच अधिकारी उरले आहेत. चकमकफेम म्हटल्या जाणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नियुक्तया घेऊन काढता पाय घेतला आहे.

त्यामुळे १९९६ ते २००३ मध्ये तब्बल १३०० गुंड ठार करणाऱ्या मुंबई पोलिसांची चकमकींची प्रतिमा आता तरी मिटली आहे. ती पुन्हा सुरू होण्याचीही शक्यता नाही, असेही एका विद्यमान भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले.

२६/११ च्या हल्ल्यात विजय साळसकर यांचा झालेला मृत्यू, सहायक आयुक्त प्रफुल्ल भोसले यांची सेवानिवृत्ती, रवींद्र आंग्रे यांची बडतर्फी तसेच लखनभय्या चकमक प्रकरणात अडकलेले शर्मा या घटनांनतर चकमक थंडावल्या होत्या. २०१६ मध्ये अंधेरीत झालेल्या उत्तर प्रदेशातील गुंड संदीप घडोलीच्या चकमकीशी मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नव्हता. शेवटची चकमक २०१० मध्ये झाली आणि त्यानंतर एकही चकमक घडलेली नाही, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चकमक ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी चकमक म्हणजे पोलिसांचे ‘कंत्राट किलिंग’ असल्याचेच नमूद केले आहे. या पाश्र्वभूमीवर आता मुंबई पोलिसांमध्ये खोटय़ा चकमकींना थारा मिळण्याची सुतराम शक्यता नाही, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे शर्मा हे पुन्हा सेवेते आले तरी त्यांना पूर्वीप्रमाणे वागता येणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.