पर्यावरण मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघ आणि भामला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ‘बीट एअर पोल्यूशन’ अशी या वर्षीची संकल्पना आहे. वायुप्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिक वायुप्रदूषण कमी करण्यास हातभार लावू शकतात.

विद्युत वाहने तयार करण्यासाठी ऑटोमोबाइल कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे व जुन्या अवजड वाहनांवर बंदी आणावी, अशी विनंती भामला फाऊंडेशनने सरकारला केली आहे. प्रदूषणामुळे दिवसेंदिवस खालावत चाललेली हवेची गुणवत्ता वाढावी आणि मानवी आरोग्यमान सुधारावे यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येणार आहेत. कचरा जाळण्याऐवजी त्याची पुनर्निर्मिती करणे,  सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करणे, विद्युत उपकरणे खरेदी करताना ती कमीत कमी प्रदूषणकारी असावीत याची काळजी घेणे, पर्यावरणस्नेही रंगांचा वापर घरांच्या भिंतींसाठी करणे इत्यादी गोष्टींविषयी मार्गदर्शन या कोर्यक्रमात केले जाणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ही चळवळ राज्यभर नेण्यात संस्थेला यश आले होते.

विशेष कार्यक्रम

२०१३ साली सिगारेट न ओढणाऱ्यांबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, भारतीयांच्या फुप्फुसांचे कार्य ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी वायुप्रदूषणावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भामला फाऊंडेशनने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ५ जूनला वांद्रे येथील संगीत सम्राट नौशाद अली मार्ग येथे होईल. वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम सांगणाऱ्या ‘हवा आने दे’ या बँडचे सादरीकरण केले जाईल. यात स्वानंद किरकिरे, शान, दिया मिर्झा, राजकुमार राव, ए. आर. रेहमान इत्यादी कलाकार सहभागी होणार आहेत.