News Flash

दक्षिण मुंबईत ‘चिपको’ आंदोलन!

अखेर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नरिमन पॉइंट येथील पोलीस ठाण्यात नेले.

अखेर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नरिमन पॉइंट येथील पोलीस ठाण्यात नेले.

झाडे वाचवण्यासाठी रहिवासी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची नवी मोहीम

कुलाबा ते सीप्झदरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा आता आणखी तापू लागला आहे. कफ परेड आणि चर्चगेट परिसरातील वृक्षतोडीविरोधात या परिसरातील रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आक्रमकपणे बुधवारी रस्त्यावर उतरले. यातील काही कार्यकर्त्यांनी झाडाला मिठी मारून वा झाडावर चढून वृक्षकत्तलीला विरोध दर्शवल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, पोलीस एका झाडाभोवतीच्या कार्यकर्त्यांना हटवून परिस्थिती नियंत्रणात आणत असतानाच दुसऱ्या झाडाभोवती दुसरे रहिवासी गोळा होत असल्याचे बुधवारी येथे पाहायला मिळाले.

मेट्रो-३मुळे दक्षिण मुंबई परिसरातील ९८ वृक्ष तोडावे लागणार आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये कमालीची नाराजी आहे. गेले आठवडाभर येथे वृक्षतोडीचे काम सुरू आहे. बुधवारी चर्चगेट परिसरातील सम्राट रेस्तराँसमोरील झाडे तोडण्याकरिता एमएमआरसीएलचा चमू कंत्राटदारासह सकाळीच दाखल झाला. मात्र रहिवाशांनी विरोध केल्याने त्यांना काम सुरू करता आले नाही. ही मंडळी पुन्हा माघारी परतली. मात्र सायंकाळी ४च्या सुमारास ‘एमएमआरसीएल’चा चमू पोलिसांच्या ताफ्यासह पुन्हा येथे आला. याचा विरोध करण्यासाठी ‘सेव्ह ट्री मुंबई मेट्रो’ या संघटनेचे कार्यकर्ते इथल्या पिंपळाच्या झाडावर चढून बसले. त्यामुळे पुन्हा कामात खंड पडला.

अखेर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नरिमन पॉइंट येथील पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर एमएमआरसीएलने याच परिसरातील शंकर जयकिसन चौकातील रवींद्र मेन्शन इमारतीसमोरील वडाचे झाड तोडण्यासाठी मोर्चा वळवला. हे पाहताच या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारा जमशेद खंबाटा याने आरडाओरडा करीत वृक्षतोड थांबविण्यास सांगितले. ‘हे वडाचे झाड साधारण दीडशे वर्ष जुने आहे. हे झाड उभारण्यासाठी पुढील कित्येक वर्षे निघून जातील,’ अशा शब्दांत खंबाटा यांनी नाराजी व्यक्त केली. या परिसरातून ये-जा करणाऱ्यांनाही वृक्षतोड थांबविण्यासाठी आम्हाला मदत करा, असे ते विनवू लागले. या वेळी परिसरातील अनेक रहिवाशीही वृक्षतोड थांबविण्यासाठी जमा झाले. पोलिसांना झाडांची कत्तल थांबवा अशी विनंती केली जात होती. परंतु, रहिवाशांना न जुमानता काम वृक्ष तोडण्याचे काम सुरूच होते. बालपणापासून घराबाहेर दिसणारी झाडांची सावली आता आपल्या सोबतीला नसेल, अशी खंत इथले रहिवासी व्यक्त करीत होते. झाडावर पडणाऱ्या प्रत्येक घावागणिक त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना तीव्र होत होत्या. मात्र हे सर्व हतबलतेने पाहण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे काहीच इलाज नव्हता.

वाहतूक कोंडी

झाडे तोडताना अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी सुरक्षाकडे उभारले होते. झाडाच्या प्रत्येक फांदीवर घाव पडत असताना रहिवासी हळहळ व्यक्त करीत होते. त्याची एक फांदी रस्त्यावरील दिव्यावर पडल्याने झाडाबरोबरच हा दिवाही तुटला होता. हे सर्व सुरू असताना रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती. गर्दी जमा झाल्यामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडीही झाली.

वृक्षतोडीसाठी कंत्राटी कामगार

मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत झाडे तोडण्यासाठी चार कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील वडाचे झाड एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या कामगारांनी तोडले. या कामगारांना झाडे तोडण्यासाठी दर दिवशी ९०० रुपये दिले जात आहेत.यातील बहुतांश कामगार हे परराज्यातून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 4:36 am

Web Title: environmentalists climb on tree to protest against tree cutting
Next Stories
1 वृक्षकत्तलीचा मुद्दा पुन्हा न्यायालयात
2 पेंग्विन कक्षाच्या विजेचा खर्च दरमहा १० लाख!
3 अवजड वाहनांमुळे आरेमध्ये वाहतूक कोंडी
Just Now!
X