अभियंता इस्थर अनुह्या हिची हत्या पूर्वनियोजित असावी, असा कयास विजयवाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. इस्थरच्या एका जवळच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
इस्थर अनुह्या ४ जानेवारी रोजी विशाखापट्टणम एक्स्प्रेसने मुंबईला निघाली होती. ५ जानेवारीला ती लोकमान्य टिळक टर्मिनसला उतरली होती. त्यावेळी एक ३५ वर्षीय इसम तिची बॅग घेऊन जातानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. या चित्रीकरणात इस्थर कुणाशी तरी फोनवर बोलत असताना दिसत आहे. दरम्यान, विजयवाडा पोलिसांनी मच्छलीपट्टणम या इस्थरच्या शहरातून तिच्या ‘खास मित्राला’ ताब्यात घेऊन मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. विजयवाडा रेल्वे पोलिसांनी या ‘खास मित्रा’बाबत धक्कादायक माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हा खास मित्र इस्थरशी तब्बल ३९ तास बोलला होता. ४ जानेवारी रोजी तोसुद्धा इस्थर सोबत विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये चढला होता आणि मुंबईला उतरला होता. परंतु तो दुसऱ्या डब्यात होता. या काळातही त्याने इस्थरशी ४१ मिनिटे संभाषण केले होते, असे विजयवाडा पोलिसांनी सांगितले. चित्रीकरणात इस्थरसोबत दिसणारा इसम या खास मित्राचा साथीदार असावा आणि त्यावेळी ती या इसमाच्या फोनवरून याच खास मित्राशी बोलत असावी एक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कोण आहे हा खास मित्र?
हा खास मित्र इस्थरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयापासूनचा वर्गमित्र आहे. तोही मच्छलीपट्टण येथे रहातो. इस्थरने विशाखापट्टण येथून ट्रेन पकडली, त्यावेळी तो तिला सोडायला स्थानकात आला होता. मात्र तो या गाडीत चढला होता, असे
पोलिसांनी सांगितले.