मुंबई : शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पुन्हा एकदा मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शवविच्छेदन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दहा दिवसांपूर्वी वडाळा येथे पूर्व मुक्त मार्गावर अपघातात जखमी झालेल्या अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरुणाचा शनिवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. त्याच्या कुटुंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अंकुशचा मृत्यू झाला त्याचवेळी विभागात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही मृतदेह न्यायवैद्यक विभागात शवविच्छेदनास पाठविले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह याच विभागात ठेवले होते. अंकुशचा मृतदेह कर्मचाऱ्यांनी

दुसऱ्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दिला. त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर अंकुशच्या नातेवाईकांना दुसरा मृतदेह दिला गेला.

न्यायवैद्यकशास्त्र विभागात मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे प्रथम चौकशीत आढळून आल्याने या विभागातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.