राज्यात ‘स्मार्ट’ शहरे उभारण्यासाठी अ‍ॅक्सेंचर कंपनी राज्य सरकारला सहकार्य करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या जागतिक सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीटर लॅसी आणि मुख्य अधिकारी ज्युली स्वीट यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ च्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री चव्हाण दाव्होस (स्वित्र्झलड) येथे गेले आहेत. जगातील बडय़ा कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांच्या उच्चपदस्थांशी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी व चर्चा सुरू आहेत. राज्यात उत्तम दर्जाच्या सुविधा असलेल्या शहरांच्या उभारणीसाठी सक्षम अंमलबजावणी यंत्रणा आवश्यक आहे. पुण्यातील हिंजेवाडी, औरंगाबाद येथील बिडकीन-शेंद्रा आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात ‘स्मार्ट’ शहरांचे मॉडेल कसे राबविता येईल, यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी अ‍ॅक्सेंचर कंपनीच्या उच्चपदस्थांशी चर्चा केली. पर्यावरण, नागरिकांचे राहणीमान, प्रशासन यामध्ये स्पर्धात्मक सुधारणा करण्यावर कंपनीचा भर असल्याचे कंपनीच्या उच्चपदस्थांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.