लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकासाठी जागा देणाऱ्या कोळी बांधवांना गिरगाव चौपाटीवरून कायमचे हद्दपार करण्याचा घाट राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने घातला आहे. या पुढे गिरगाव चौपाटीमध्ये मासेमारी करता येणार नाही, अशा आशयाची नोटीस बजावून या कोळ्यांना येथून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र गिरगाव चौपाटीमध्ये उपऱ्यांना कायमस्वरूपी जागा देऊन भूमिपुत्रांना बेघर करण्याचा डाव उधळून लावण्याचा निर्धार कोळी बांधवांनी केला असून, कोळी समाजातील अन्य संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
गिरगाव चौपाटीमध्ये ब्रिटिश काळात दोन छोटे कोळीवाडे होते. लोकमान्य टिळकांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे गिरगाव चौपाटीमध्येच स्मारक उभारण्यात यावे अशी टिळक समर्थकांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळी एका कोळीवाडय़ातील कोळी कुटुंबाने आपली जागा स्मारकासाठी देऊन टाकली. या दोनपैकी विल्सन महाविद्यालयासमोरील कोळीवाडा आग लागल्यामुळे खाक झाला.
मात्र या कोळीवाडय़ातील काही रहिवासी आजही गिरगाव चौपाटीत उघडय़ावर कसेबसे दिवस काढत आहेत. तर नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे दुसऱ्या कोळीवाडय़ातील रहिवासी इतरत्र निघून गेले. काही रहिवाशांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौपाटीच्या कोपऱ्यामध्ये मफतलाल जलतरण तलावाच्या बाजूला जागा दिली. या जागेमध्ये सहा झोपडय़ा बांधून हे रहिवासी राहात आहेत. उधाणाच्या वेळी लाटांचे पाणी या झोपडय़ांमध्ये शिरते. याच किनाऱ्यावर या सर्व रहिवाशांच्या होडय़ा नांगरून ठेवलेल्या असतात.
भल्या पहाटे मासेमारीसाठी ही मंडळी खोल समुद्रात जातात आणि रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मासेमारी करून परतात. जाळ्यात पकडलेले मासे विकून मिळणाऱ्या पैशामध्ये या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.
गेली अनेक वर्षे या कोळी बांधवांच्या होडय़ांना ससून डॉककडून गिरगाव चौपाटी बंदरात मासेमारी करण्याचा परवाना देण्यात येत आहे. काही कोळ्यांना १२ मार्च २०१४ ते ११ मार्च २०१७ पर्यंत परवाना देण्यात आला आहे. आता मत्स्यव्यवसाय विभागाने या कोळ्यांवर २८ ऑगस्ट रोजी नोटिसा बजावल्या आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील मासेमारीसाठी बंदरांची अधिसूचना जाहीर केली असून त्यामध्ये गिरगाव चौपाटीचा समावेश नाही. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर मासेमारी करता येणार नाही असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या कोळ्यांनी   गिरगाव चौपाटीऐवजी अन्य ठिकाणच्या बंदरामध्ये मासेमारी करावी, असेही त्यात म्हटले आहे.
मुंबईमधील अन्य बंदरांमध्ये इतर ठिकाणच्या कोळ्यांना मासेमारी करण्यास स्थानिकांकडून अटकाव केला जातो. त्यामुळे आम्हाला इतर बंदरांमध्ये मासेमारी करता येणार नाही.
नोटीस हाती पडल्यानंतर आम्हाला मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास अटकाव करण्यात येत आहे. तसेच शासकीय यंत्रणांकडून त्रास देण्यात येत असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरही बोटी ठेवणे अवघड बनले आहे. परिणामी आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.
या समुद्रकिनाऱ्याचा दर्शनी भाग एकेकाळी भेळपुरीवाले आणि कुल्फीवाल्यांच्या स्टॉलमुळे अडला गेला होता. काही वर्षांपूर्वी हे स्टॉल हटविण्यात आले. परंतु नंतर भेळपुरीवाले आणि कुल्फीवाल्यांना चौपाटीच्या एका कोपऱ्यामध्ये भेल प्लाझा उभारून देण्यात आला. या व्यवसायिकांमध्ये परप्रांतीयांचा भरणा अधिक आहे.
परप्रांतीयांना कायमस्वरूपी स्टॉल बांधून देणारे राज्य सरकार टिळकांच्या स्मारकासाठी विनामूल्य जागा देणाऱ्या भूमिपुत्रांना गिरगाव चौपाटीतून हद्दपार करण्याच्या तयारीत आहे.
अशी सापत्न वागणूक का देण्यात येत आहे, असा सवाल या कोळी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
तीव्र आंदोलन करू
ब्रिटिश काळापासून गिरगाव चौपाटी बंदरात मासेमारी करणाऱ्या कोळ्यांवर राज्य सरकार अन्याय करीत आहे. याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यात मुंबईतीलच नव्हे तर अन्य शहरांतील कोळी बांधव उतरतील.
-दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती