रवींद्र नाटय़मंदिरात आयोजन; किल्ले, गावातील चावडीच्या प्रतिकृती

ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारा ‘माणदेशी महोत्सव’ सध्या मुंबईकरांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरात आजोजित या महोत्सवाच्या निमित्ताने माणदेशातील खाद्यपदार्थ आणि संस्कृती मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. आज (१२ जानेवारी) या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत महोत्सव खुला राहणार आहे.

माणदेशी महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात गावाकडचे किल्ले, गावातील चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गोठा यांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. माणदेशाची खासियत असलेले घोंगडी, दळण्यासाठीची जाती आणि खलबत्ते, केरसुण्या, दुरडय़ा, सुपल्या आदी साहित्यांबरोबरच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चवही मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे.

महोत्सवात १०० ग्रामीण उद्योजक सहभागी झाले असून, त्यांनी घरी तयार केलेल्या खास सातारी चटण्या, पापड, लोणचे, खर्डा, ठेचा, शेव-पापड आणि विविध पेयपदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. त्याचबरोबर खवय्यांसाठी ज्वारीची भाकरी, कुरडय़ा, भातवडय़ा आणि कंदी पेढेही येथे उपलब्ध आहेत.

मुंबईत बाजारपेठ उपलब्ध करून देणार – गोऱ्हे

माणदेशी भगिनींची कामगिरी जागतिक स्तरावर नोंद घेण्यासारखी आहे. एकीकडे गुन्हेगार बँकांचे पैसे बुडवून जात असताना ९९ टक्के महिला बचतगट पैशांची परतफेड करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. स्त्रीची आर्थिक परिस्थिती बदलली की मान-सन्मान मिळतो. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हा, असा सल्ला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नीलम गोऱ्हे यांनी महिलांना दिला. तसेच माणदेशी महिलांसाठी मुंबईत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.