गावाची ओढ असलेल्या मजुरांची आर्थिक मदतीने पाठवणी

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : अचानक काम गेल्याने आलेले उपासमारीचे दिवस, के लेल्या कामाचेही वेतन देण्यास नकार देणारा कारखान्याचा मालक वा कं त्राटदार, भाडे भरायला पैसे नाहीत म्हणून घराबाहेर काढणारे घरमालक.. महानगरींचे दैनंदिन चक्र  थांबल्याने पोटापाण्यासाठी शहरांत आलेल्या अनेक श्रमिकांनी ही कटू अनुभवांची शिदोरी घेऊनच परतीची वाट धरली. पण हे या शहराचे अर्धेमुरे चित्र म्हणता येईल. ज्यांच्या श्रमांवर आपला व्यवसाय चालतो अशांची आर्थिक मदतीने गावी पाठवणी करणारा कारखानदार,

कं त्राटदार मालकही याच शहरात वसतो. धारावीसारख्या कष्टकऱ्यांच्या वस्तीत अशा अनेक कारखानदार, व्यावसायिकांनी आपल्या कु शल कामगाराला रस्त्यावर येऊ दिले नाही. कारखानदाऱ्यांच्या या ‘आत्मनिर्भर पॅटर्न’मुळे अजूनही धारावीत शेकडो असे मजूर आहेत की जे घरी जायला तयार नाहीत.

टाळेबंदी ओसरल्यानंतर कामगारांनी पुन्हा यावे, या हेतूने धारावीतील अनेक कामगारांचे मालक त्यांना ऐपतीप्रमाणे का होईन थोडाफार पैसाअडका देऊन त्यांची पाठवणी करत आहेत. त्यामुळे इतर भागांत जशी कामगारांची परवड सुरू आहे, तशी धारावीतील परप्रांतीयांची झालेली नाही. अर्थात याला अपवादही असू शकतो. हा काळजी घेणारा कारखानदार, मालक धारावीत असल्यानेच बहुधा अजूनही शेकडो मजूर गावी जाण्यास तयार नाहीत.

‘महिनाभरात सगळे सुरळीत होईल. गावी जाऊन तरी काय करणार त्यापेक्षा इथे राहिलेले बरे,’ अशी भावना येथील मजूर व्यक्त करतात. हे चित्र प्रामुख्याने मोठय़ा कारखानदारांकडे दिसून येते. राहण्यासाठी मुबलक जागा आणि आर्थिक सुबत्तेमुळे कारखानदारांकडून या मजुरांची खाण्यापिण्याची काळजी घेतली जात आहे. ज्यांना गावाची ओढ होती, त्यांचीही गावी जाण्याची सोय कारखानदारांनी करून दिली. ‘आम्ही मजुरांना दिवसाच्या हिशोबाने पगार देतो. पण, दोन महिने व्यवसाय ठप्प झाल्याने मजुरांचा पगार, जेवणखाण याचा आर्थिक भार वाढत गेला. शिवाय मजुरांची मानसिक स्थिती ढासळू लागल्याने आम्ही काही कारखानदार एकत्र आलो. रेल्वेने पाठवण्यात दिरंगाई होत असल्याने खासगी गाडय़ांची व्यवस्था के ली. वैद्यकीय चाचणी करून काही औषधे आणि पैसे देऊन त्यांना पाठविले. ते सुखरूप घरी पोहोचले याचे समधान आहे,’ असे कापड उद्योगातील संतोष श्रीवास्तव यांनी सांगितले.

आपल्या राज्यात निघालेला सलमान सांगतो, ‘गेल्या दोन महिन्यांत मालकाने आमची घरच्या माणसांप्रमाणे काळजी घेतली. जातानाही प्रत्येकी तीन ते चार हजार दिले.’ काही कारखानदार आपल्या मजुरांना निरोप देण्यासाठीही येतात. ‘काही कारागीर गेली वीस वर्ष आमच्याकडे काम करत आहेत. चर्मोद्योगाचा डोलारा त्यांच्या जिवावर आहे. त्यामुळे मजुरांशी घरचे संबंध निर्माण झाले आहेत. उद्या त्यांच्याच मदतीने आम्हाला व्यवसाय उभा करावा लागणार आहे. त्यामुळे मजुरांना जपलेच पाहिजे,’ असे चर्मोद्योग व्यवसायातील अक्रम खान यांनी सांगितले.

घराकडे डोळे

शीव स्थानक ते पिवळा बंगला या अंदाजे ५०० मीटरच्या रस्त्यावर दररोज हजारो मजूर घरी परतण्यासाठी जमतात. मंगळवारी तर सकाळी सात वाजल्यापासून मजूर रांगेत होते. पाण्याचे कॅन, खाण्यापिण्याची पाकिटे, गावी नेण्यासाठी गोण्यांमध्ये भरलेले किडुकमिडुक सामान, बॅगा सावरत अनेकजण रांगेत उभे असतात. पाच-सहा तास उन्हात उभे राहून देखील त्यांच्यात नाराजीचा सूर नसतो, असते ती की के वळ घराकडे परतण्याची ओढ.