उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण? छाननीत रविवापर्यंत लाखभराहून अधिक शेतकरी अपात्र

शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेचा मोठय़ा जल्लोषात बुधवारी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू झाली असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी घोषणा करतील. राज्यातील काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी या सोहळ्यासाठी मुंबईत आमंत्रित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून निकषांनुसार सुमारे लाखभराहून अधिक शेतकऱ्यांना सध्या अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह प्राप्तिकर करदाते आणि लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.

राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ऐतिहासिक असून केवळ चार-महिन्यांच्या कालावधीत प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात धनत्रयोदशी व नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ऑनलाइन छाननीची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे ५६ लाख ५८ हजार शेतकरी कुटुंबीयांनी अर्ज केले आहेत. निकषांनुसार आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतिनिधी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी (चतुर्थश्रेणी वगळून), केंद्रीय आस्थापनांचे कर्मचारी, शिक्षक, प्राप्तिकरदाते आदींना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तरीही हजारो शासकीय-निमशासकीय कर्मचारी व प्राप्तिकरदात्यांनी अर्ज केले आहेत. आधारक्रमांक सक्तीचा केल्याने प्राप्तिकर विभागाकडून माहिती संकलित केल्यानंतर आणि कर्मचाऱ्यांच्या यादीशी पडताळणी केल्यावर सुमारे लाखभर अपात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्याचे दिसून आले आहे. त्यांना सध्या रेड झोनमध्ये टाकून अपात्र ठरविण्यात आले आहे.

राज्य सरकारने सुमारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली असून दिवाळीत पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी निधीची कोणतीही अडचण नाही. अतिरिक्त २० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याने गरज भासल्यास तोही पर्याय उपलब्ध आहे, असे अर्थविभागाच्या सूत्रांनी सांगितले. कर्जमाफी ऐतिहासिक असून राज्य सरकारने ती स्वबळावर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना सन्मानित करून हा सोहळा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असल्याने ठाकरे यांनाही कार्यक्रमास निमंत्रित करावे लागेल. कर्जमाफीसाठी ठाकरे व शिवसेनेने कायम सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संघटनांबरोबर सामील होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तरीही भाजपने घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी दिली, हे दाखवून देण्यासाठी ठाकरे यांना आवर्जून निमंत्रित करावे, असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे.

कर्जमाफीचा जल्लोष पक्षाच्या पातळीवरही राज्यभरात करण्यात येणार असून गावागावांमध्ये अनेक कार्यक्रम, दिंडय़ा काढल्या जातील, जाहिराती, फलक लावले जातील आणि भाजपने आश्वासनाची पूर्ती करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला, हे ठसविण्याचा प्रयत्न शासकीय व पक्षपातळीवरून केला जाणार आहे. सरकारला ऑक्टोबरअखेरीस तीन वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या जाहिराती व प्रचारमोहिमेत कर्जमाफीला सर्वाधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.