टिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टीच्या पतीचा चिड आणणारा एक प्रकार समोर आला आहे. आदर्श उपाध्याय असं त्यांचं नाव आहे, जिवंत काडतुसे रिव्हॉल्वरमध्ये भरण्याचं प्रशिक्षण देत ती रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हाती देण्याचा प्रताप त्यांनी केला आहे. आदर्श उपाध्याय एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन तो व्हिडिओ व्हॉट्स अॅप स्टेटस म्हणूनही ठेवला आहे. त्या चिमुकल्याने लोड केलेली बंदुक जर चुकून चालवली असती तर अनर्थ घडला असता हा साधा विचारही उपाध्याय यांच्या मनात आला नसावा का? की असा विचार येऊनही बघूया खेळ करुन म्हणून त्यांनी हा खेळ केला असावा? असे एक ना दोन प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हॉट्स अॅप स्टेटसवर हा व्हिडिओ पोस्ट केल्याने तो व्हायरल झाला आणि एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. यानंतर उपाध्याय यांना प्रतिक्रिया विचारली असता, तो माझा मुलगा आहे तो हट्ट करत असल्याने त्याच्या हाती रिव्हॉल्वर दिलं. मला कोणीही प्रश्न विचारु शकत नाही, उत्तर देण्यासाठी दबाव आणू शकत नाही असं उत्तर उपाध्याय यांनी दिलं आहे. आदर्श उपाध्याय हे टिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टींचे पती आहेत.

मुंबईतल्या गोरेगाव भागात एक चिमुकला गटारात पडून वाहून गेला. अशा घटना टाळण्यासाठी मुलांना जपा, त्यांची काळजी घ्या असं आवाहन केलं जातं आहे. टिटवाळ्यातले हे आदर्श उपाध्याय इतरांपुढे कोणता आदर्श ठेवत आहेत हा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे.