स्वत:च्या मुलीवर सतत सहा महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास ठाणे न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा आरोपी भिवंडीतील चितपाडा भागात राहतो.
ठाण्याच्या दुसरे सत्र न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत दुसरे जिल्हा न्यायाधीश व्ही. व्ही. गिरकर यांनी हा निकाल दिला. आरोपीची पत्नी धुणीभांडीची कामे करीत असे. ती कामावर गेल्यानंतर तो आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. सतत पाच ते सहा महिने हा प्रकार सुरु होता मुलीच्या आईच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने २३ डिसेंबर २०११ रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली. या खटल्याची अंतिम सुनावणी सोमवारी झाली त्यावेळी न्यायाधीश गिरकर यांनी हा निकाल दिला. यावेळी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अशोक खामकर यांनी काम पाहिले.