पालिका प्रशासनाचा अजब व्यवहार

मुंबईमधील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून वाहनावर बसविण्यात आलेल्या सात सक्शन मशीन खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून हे काम दोन कंपन्यांना विभागून देण्यात येणार आहे. मात्र पुढील आठ वर्षे या मशीनच्या देखभालीसाठी ४० कोटी रुपये या दोन्ही कंपन्यांना देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तुलनेत कमी किमतीत खरेदी केलेल्या मशीनच्या देखभालीवर दामदुपटीने खर्च करून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

मुंबईमधील मलनिस्सारण वाहिन्यांची सक्शन मशीनद्वारे सफाई केली जाते. वाहनावर बसविण्यात येणाऱ्या या मशीनद्वारे मॅनहोलमधून मलनिस्सारण वाहिनीत साचलेला गाळ उपसला जातो. गल्लीबोळातून जाणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाईसाठी १.५ घनमीटर क्षमतेच्या सक्शन मशीन घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. या दोन्ही कंपन्यांना हे कंत्राट विभागून देण्यात येणार आहे. शहर भागाचे कंत्राट हिंदुस्थान इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनला देण्यात येणार असून ही कंपनी चार वाहनांवर बसविलेल्या सक्शन मशीन पालिकेला पुरविणार आहे. एका मशीनची किंमत २४ लाख ७५ हजार रुपये यानुसार चार मशीनसाठी पालिका ९९ लाख रुपये खर्च करणार आहे. या चार मशीनची आठ वर्षे देखभाल करण्यासाठी या कंपनीला १९ कोटी २४ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

पूर्व उपनगरांसाठी तीन मशीन खरेदी करण्यात येणार असून हे कंत्राट आयपीडब्ल्यूटी कॉर्पोरेशन कंपनीला देण्यात येणार आहे. प्रत्येकी २४ लाख ५० हजार रुपयांच्या तीन मशिन्ससाठी पालिका ७३ लाख ५० हजार रुपये मोजणार आहे. या तिन्ही मशीनची आठ वर्षे देखभाल करण्यासाठी पालिकेकडून या कंपनीला १३ कोटी ७६ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

  • दोन्ही कंपन्यांकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या मशीनच्या दरात सुमारे २४ हजार रुपयांचा फरक आहे. तसेच या मशीनचा पाळ्यांमध्ये करण्यात येणाऱ्या वापरासाठी वेगवेगळा दर आकारण्यात येणार आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने दोन्ही कंपन्यांना हे काम विभागून देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मलनिस्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेबाबत हा मोठा भ्रष्टाचार असून या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत विरोध करण्यात येईल. दोन्ही कंपन्यांनी संगनमत करून ही कामे मिळविली असून पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही या मशीनच्या खरेदीला तीव्र विरोध केला आहे.