बोरिवली पश्चिम येथील एका शॉपिंग सेंटरला आज (शनिवार) सकाळी आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहंगदाळे यांनी म्हणाले, “आग आता शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर पसरत चालली आहे. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांबरोबरच फायर रोबोटही आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येत्या दोन तासांत आग नियंत्रणात येईल.”

ही भीषण आग लेव्हल ४ची असल्याचे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सकाळी आगीच्या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्याचबरोबर पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली. शॉपिंग सेंटर आगीच्या भक्षस्थानी पडल्याने बराच मोठा माल यात भस्मसात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मोठ्या प्रमाणावर काळा धूर या परिसरात पसरला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काय आणि किती नुकसान झाले याचा तपशिल अद्याप मिळू शकलेला नाही.

दरम्यान, अशाच प्रकारे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मानखुर्द घाटकोपर लिंक रोड दरम्यान असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला सकाळी ६ च्या सुमारास आग लागली होती. ही आग लेव्हल ३ ची असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली होती. या ठिकाणी स्क्रॅप करण्यात आलेल्या वस्तू आणि तेलाच्या डब्यांनाही आग लागली होती.