आपत्कालीनसमयी पुण्याजवळील तळेगावातून मुंबईकरांच्या मदतीला धाऊन येणाऱ्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) कौशल्याचा अग्निशमन दलातील काही अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. एनडीआरएफच्या कामगिरीमुळे अग्निशमन दलाच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ नये म्हणून शिवसेनाप्रणित मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेने एनडीआरएफची पथके मुंबईत ठेऊच नयेत, अशी भूमिका घेत सरकार आणि पालिकेला आव्हान दिले आहे.
तळेगाव येथील मुख्यालयातून मुंबईत येण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना बराच वेळ लागत असल्यामुळे त्यांच्या दोन तुकडय़ा कायमस्वरुपी मुंबईतच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि या तुकडय़ांसाठी जागा निवडण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविली. पालिकेने जागा मिळेपर्यंत एनडीआरएफच्या तुकडय़ांची अंधेरीच्या राजे शहाजी भोसले क्रीडा संकुलात तात्पुरती व्यवस्था केली आहे. दरम्यानच्या काळात एनडीआरएफच्या जवानांसाठी पालिका प्रशासनाने मानखुर्द आणि बोरिवली येथील जागा निवडल्या. मात्र अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी त्यातमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला.
आता अग्निशमन दलातील काही अधिकाऱ्यांनी चक्क एनडीआरएफ नकोच असा जप सुरू केला आहे. मुंबई अग्निशमन दल लढाई कामगार संघटनेने थेट महापौरांनाच पत्र पाठवून एनडीआरएफला विरोध दर्शविला आहे. एनडीआरएफच्या जवानांना अग्निशमन दलाच्या इमारतीत जागा देण्यात येत आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या राहत्या इमारतीत त्यांची निवासाची व्यवस्थाही केली जात आहे. यामुळे अग्निशमन दलातील जवानांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप संघटनेने महापौरांना पाठविलेल्या पत्रात
केला आहे.  इतकेच नव्हे तर एनडीआरएफची मुंबईत गरजच नाही, असेही या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.