सांताक्रुझ येथील आंतरदेशीय विमानतळालाच्या टर्मिनल १ ए या ठिकाणी असलेल्या कॉन्फरन्स हॉलला दुपारी आग लागली. मुंबईत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीच कमला मिलमध्ये असलेल्या मोजो ब्रिस्ट्रो आणि १ अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली होती. यामध्ये १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईचे सत्र न्यायालय, तसेच माझगाव या ठिकाणचे गोदाम अशा ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. शनिवारी मुंबईतील विमानतळाला आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत. विमानतळाजवळ असलेल्या सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दुपारी ही आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मागच्या रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

या घटनांचा विचार केला तर मागील एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत मुंबईत आग लागण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल.