रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाहूर स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील सीएट टायर्सच्या कारखान्यातून आगीचे लोळ उठू लागले. काही वेळातच या आगीने भीषण स्वरूप धारण केले. या आगीच्या धुराने नाहूर स्थानकापर्यंतचा परिसर कवेत घेतल्याने या स्थानकात गाडय़ा थांबवणे अशक्य झाले आणि रेल्वे सेवाही कोलमडली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.
फोटो गॅलरीः सीएट टायर्स कारखान्यात भीषण आग
या आगीचे कारण कळू शकले नाही. २२ अग्निशामक बंब आणि नऊ पाण्याचे टँकर यांच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंज देत होते. या आगीत चार जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने मात्र केवळ गणेश कुप्टे हा तरुण जखमी झाल्याचे सांगितले. त्याला मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारखान्यात रबर आणि सल्फर हे दोन घटक असल्याने आगीदरम्यान छोटय़ाछोटय़ा स्फोटांचे आवाज होत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. आग संध्याकाळी लागल्याने वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होता. त्यामुळे धुराचे लोळ पश्चिम दिशेकडील इमारतींकडे न जाता पूर्वेकडे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दिशेने वळले. सुदैवाने यादरम्यान उंच इमारती फार नसल्याने रहिवाशांना धुराचा त्रास फारसा जाणवला नाही.
उपनगरी सेवेवर परिणाम
आगीमुळे धुराचे लोळ उठू लागल्याने अध्र्या तासातच ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या. आग अधिकच भडकल्याने संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या गाडय़ांनाही नाहूर स्थानकात मज्जाव करण्यात आला. या गाडय़ा अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या. रेल्वे वाहतूक विक्रोळी ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरूनच चालू होती. प्रत्यक्षात रेल्वे परिसराला आगीचा उपसर्ग झाला नसला तरीही प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता संध्याकाळी सात वाजल्यापासून आम्ही नाहूर स्थानक प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले.