खोपोलीहून सीएसटीला येणाऱ्या लोकल ट्रेनच्या मालडब्यात मंगळवारी संध्याकाळी आग लागली. ट्रेनमधून धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. सुदैवाने परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत झाली आहे.

मंगळवारी संध्याकाळी खोपोलीहून सीएसटीला जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्टेशनवरुन निघाली. घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान लोकल ट्रेनच्या मालडब्यातून धूर येऊ लागला. या प्रकाराने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मालडब्यातून केरोसिन नेले जात होते आणि त्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून ट्रेन सीएसटीकडे रवाना झाल्याचे समजते. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे काही काळाकरता सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली होती.