नवी मुंबई पोलिसांच्या सागरी गस्तीसाठी असलेल्या ‘शक्ती’ या नौकेत सोमवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू असताना स्फोट झाला. यामुळे  लागलेल्या आगीत दुरुस्तीचे काम करणारे दोन कामगार होरपळले असून त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये उपाचार सुरू आहेत़
वाशी ते उरण असा विस्तीर्ण सागरी किनारा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. देशातील महत्त्वाचे बंदर असलेले जेनपीटीचाही यात समोवश आहे. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये असलेले तेल आणि गॅस प्रकल्प यामुळे सागरी सुरक्षेसाठी पोलिसांना डोळयात तेल घालून गस्त घालावी लागते.
सध्या सागरी पोलिसांकडील सहा गस्त नौकांपैकी तीन नौका सुस्थित असून तीन नौका नादुरूस्त आहेत. यातील शक्ती या नौकाचे सोमवारी सिबिडी येथील रेतीबंदर येथील पुलाजवळ दुरुस्तीचे काम सुरू होते. ब्रिलियन्स सिंगल या कंपनीचे कुलदीप मांगडे आणि विभू साहू हे दोन कामगार काम करीत असताना अचानक बोटीमधील डिझेलच्या टाकीला आग लागून भडका उडाला यात मांगडे आणि साहू हे दोघे ही होरपळल़े दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली़