मुलुंड, सीडनहॅम महाविद्यालयांतील आगीच्या घटनांमुळे प्रश्न

महिनाभरात मुलुंड आणि सिडनहॅम या दोन महाविद्यालयांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमुळे महाविद्यालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ख्रिसमसच्या पहाटे चर्चगेटमधील सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आग लागून तब्बल १६ हजार पुस्तके जळून खाक झाली. साधारणत: महिनाभरापूर्वीच मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेला आग लागली होती. खरे तर जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारने राज्यातील सर्व सरकारी इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश काढले होते. याच वेळी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांचेही अग्निसुरक्षा परीक्षण करावे, अशी मागणी जोर धरू लागली. यानंतर राज्य शासनाच्या अग्निशमन विभागातर्फे संबंधित परीक्षण करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. तसेच या कामासाठी काही संस्थांचीही नेमणूक करण्यात आली होती. याचबरोबर विद्यापीठानेही त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांकडून अग्निसुरक्षा परीक्षण अहवालाचा तपशील मागविण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली होती. मात्र त्या वेळेस खूप कमी महाविद्यालयांनी विद्यापीठाला प्रतिसाद दिला होता. तसेच ज्या महाविद्यालयांनी माहिती उपलब्ध करून दिली नाही अशा महाविद्यालयांवर कोणतीही कार्यवाहीदेखील करण्यात आली नव्हती. यामुळे पुन्हा हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला.

प्रत्यक्षात दरवर्षी अग्निसुरक्षा परीक्षण करणे आवश्यक असते. यामध्ये इमारतीमध्ये बसविण्यात आलेली अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, त्याचा दर्जा काय आहे, त्यात काही दुरुस्ती आवश्यक आहे का, अशा विविध बाबींची तपासणी केली जाते. मात्र ‘अनेकदा शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ देखावा म्हणून ही व्यवस्था असते. प्रत्यक्षात ती कार्यरत आहे की नाही याची तपासणी होतच नाही. म्हणून हे परीक्षण आवश्यक असते. शैक्षणिक संस्थांनी याबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून विद्यापीठातर्फे महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणाऱ्या स्थानीय चौकशी समितीने हे प्रमाणपत्र आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात तसे होत नाही आणि अनेकदा महाविद्यालयांमध्ये आग लागल्यावर ती नियंत्रणात आणण्यास जास्त अवधी जातो व नुकसान होते,’ असे मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी सांगितले, तर ‘अग्निसुरक्षा परीक्षणाचा मुद्दा आम्ही अधिसभेत मांडला होता. याचबरोबर त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला होता; पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नी विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासन उदासीन दिसून येत आहेत,’ असा आरोप अधिसभेचे माजी सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला. मुलुंड वाणिज्य महाविद्यालय व सिडनहॅम महाविद्यालयाला लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने याबाबतीत दखल घेऊन पुन्हा एकदा महाविद्यालयांना अग्निसुरक्षा परीक्षण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणीही तांबोळी यांनी केली.

१६ हजार पुस्तके खाक

सिडनहॅम व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला लागलेल्या आगीत १६ हजार ५०० पुस्तके जळून खाक झाली आहेत. यामध्ये ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्य़ू’ या मालिकेच्या संग्रहाबरोबरच अनेक दुर्मीळ पुस्तकांचाही समावेश होता. आगीची माहिती कळताच सुट्टीच्या कालावधीतही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात धाव घेतली व प्रशासनाला मदतीचा हात दिला. याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेनेही तातडीने काही आवश्यक पुस्तके खरेदी करण्यासाठी महाविद्यालयाला पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, तर मुंबई विद्यापीठानेही ग्रंथालय सुसज्ज होईपर्यंत या विद्यार्थ्यांना चर्चगेट संकुलातील ग्रंथालयामधील पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे सिडनहॅम प्रशासनातर्फे सांगण्यात आले.