*  अभिनेता विंदु दारासिंग याला अटक
*  आणखीही ‘बॉलीवूड कनेक्शन’ उघडकीस येणार
 क्रिकेटच्या मैदानावरून सुरू झालेला सट्टेबाजीचा ‘स्पॉट’ आता बॉलीवूडच्या चकचकीत दुनियेत पोहोचला आहे. सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याप्रकरणी तसेच आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी दिवंगत अभिनेते दारासिंग यांचा मुलगा अभिनेता विंदू रंधवा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. आयपीएलच्या सामन्यांमध्ये तसेच सामन्यांनंतरच्या पाटर्य़ामध्ये विंदूची उपस्थिती, सट्टेबाजांशी असलेला त्याचा संपर्क यांच्या आधारे विंदूला अटक करण्यात आली असून आणखीही काही बॉलीवूड कलावंत ‘स्पॉट फिक्सिंग’च्या जाळय़ात सापडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तीन क्रिकेटपटूंच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची ‘फिल्डिंग’ कामी
विंदू दारासिंग याला अटक करून मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीच्या जगताशी बॉलीवूडचा असलेला संबंध खुला केला आहे. ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या विंदूला २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल आणि सट्टेबाज प्रेम तनेजा यांनाही मंगळवारी अटक केली. पटेल यांच्याकडून १.६४ कोटींची रोख रक्कमही जप्त करण्यात आली असून ती सट्टेबाजीच्या व्यवहाराशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.
धोनीच्या पत्नीचीही चौकशी?
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारा सिंगने महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिच्यासोबत ६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याचा आनंद लुटला होता. त्यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चाही रंगली होती.
त्यामुळे या प्रकरणात साक्षीचा हात आहे की नाही, हे तपासण्यासाठी तिची चौकशी होण्याची शक्यता आहे.   
श्रीशांतची ‘दौलतजादा’
‘स्पॉट-फिक्सिंग’मधून मिळालेल्या पैशातून एस. श्रीशांतने मुंबईतून एक लाख ९५ हजार रुपयांचे कपडे खरेदी केले आणि एका मैत्रिणीला भेट देण्यासाठी महागडा स्मार्टफोनसुद्धा विकत घेतला होता. श्रीशांतने सर्व व्यवहार रोख पैसे देऊन केले होते, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला.
बंदीची याचिका फेटाळली
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे काळवंडलेल्या आयपीएलवर बंदी घालण्यासंदर्भातील जनहित याचिका न्यायमूर्तीच्या खंडपीठाने फेटाळून लावली. आयपीएलमधील अनियमितता आणि ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाशी सामना करताना ‘बेफिकिरीचे’ धोरण बाळगणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ताशेरे ओढले.